नाशिकमध्ये यंत्रमाग कारखान्यांना भीषण आग

मालेगाव : ५ नोव्हेंबर – नाशिकमध्ये आगीच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाही. आता नाशिकच्या मालेगावमधील द्याने शिवारात एक मोठी दुर्घटना घडली. यात अनेक यंत्रमाग कारखान्यांना आग लागल्याने भीषण अग्नितांडव पाहायला मिळाला. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालं असल्याचं समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेत आगीने अनेक कारखान्यांना भक्षस्थानी घेतलं आहे. यात लाखोंचे नुकसान झालं आहे. घटनेची काही व्हिडिओही समोर आले आहेत. ज्यामध्ये आगीचे लोट पाहायला मिळतात. यावरुनच घटनेची भीषणता लक्षात येते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही.
दोन दिवसांपूर्वीच आगीची घटना –
नाशिकमध्ये दोन दिवसांआधीच आगीची आणखी एक घटना समोर आली होती. यात एका फर्निचर मॉलसह भंगार गोदामाला आग लागली होती. आग लागली त्यावेळी फर्निचर मॉलमध्ये आठ ते दहा कामगार झोपलेले होते. मात्र, त्यांना वेळीच जाग आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, या आगीतही लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं.
ही घटना नाशिकच्या वडनेर-पाथर्डी रोडवर घडली होती. या आगीच्या घटनेत संपूर्ण मॉलसह भंगार गोदाम जळून खाक झाले. तर, आजच्या घटनेतही लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. पहाटे लागलेली ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply