ट्रक आणि बीएसएफच्या वाहनाचा भीषण अपघात, २ जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली : ५ नोव्हेंबर – भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या बारमेर जिल्ह्यातील चौहटन पोलीस स्टेशन परिसरात काल रात्री बीएसएफचे वाहन आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की बीएसएफच्या गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात बीएसएफच्या दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर बाकी पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जोधपूरला हलवण्यात आले आहे. दोन जवानांवर बारमेर आणि एका जवानावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बारमेर-चौहटन मार्गावरील चौहटन बसस्थानकाजवळ हा अपघात झाला. सीमा सुरक्षा दलाच्या ८३व्या बटालियनचे सात जवान सेडवा येथून बारमेरला त्यांच्या कामासाठी येत होते. याचदरम्यान, चौहान शहराजवळ बीएसएफचे वाहन आणि समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात सीमा सुरुक्षा दलाच्या दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला तर बाकी पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच चौहटन पोलीस ठाणे व परिसरातील नागरिक तेथे पोहोचले. त्यांनी तात्काळ गंभीर जखमी जवानांना चौहटन येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर चार जनवानांना बारमेर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्याचवेळी जखमी जवानाला चौहटन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. नंतर बाडमेरमधील दोन जवानांनाही जोधपूरला पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच बीएसएफचे अधिकारी, जिल्हाधिकारी लोकबंधू, एएसपी नरपत सिंह जैतावत आणि एसटीएम घटनास्ळी पोहोचले.

Leave a Reply