आणि त्याच्या आर्त हाकेने आठवणींच्या गर्दीचा बांध फुटला…

दिवाळी खरेदीच्या गर्दीने फुलून गेलेल्या रस्त्यातून मी वाट काढतांना मागावून एक आर्त स्वर माझ्या कानी पडला तो म्हणजे चंदूजी. तो आवाज ऐकून मी थबकलोच नव्हे मागे वळून बघतो तोच तो दीन दलित मला म्हणाला, ओळखलंत मला चंदू… मी मधू आज प्रत्यक्षात मी ७६व्या वयात वार्धक्याकडे झुकलो असलो तरी मला त्या हाकेने प्रत्यक्ष भूतकाळात नेलं. त्याला न्याहाळताच ती अफाट गर्दी हरवून मी भूतकाळात गेलो. आणि नेमकं मला आठवलं की अवघ्या तिसऱ्या चौथ्या वर्गात फरशीवर अंथरलेल्या फाऱ्या पट्टीवर मी आणि मधू एकत्र बसत असू. तसे वर्गातले सारे मित्र खट्याळच. वर्गात सर नसले की नाचणं-गाणं-मुरडणं आणि भांडणे चालायची. पण सरांनी वर्गात येता च दम भरताच चिडीचूप व्हायचो. शाळेची घंटी आणि प्रार्थना झाली की आमची वर्ग खोली भरून जायची, मग सरांनी शिकवलेल्या छान कवितांचे गायन सुरू व्हायचे. उठ गोपाळ जी, जाई धेनु कडे-पाहती सवंगडी वाट तुझी, तरुण आखाड्याकडे धाव घेती-वृद्ध भूपाळ्या म्हणत राहताती, पाखरांची शाळा भरे पिंपळावरती-चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती, पहा सजविले कसे देव हे परधान्या राजा-आज तयांची करूया पूजा गर्जती बँड बाजा अश्या अनेक कवितांचा एकत्र जागर व्ह्यायचा. मधू तसा उनाडच फालतूपणात दोन हात पूढेच तसा तो वर्गात ‘ढ’ म्हणचे ढत्कृष्टच. ४थी-५वी मध्ये दुर्दैवाने त्याचे आई वडील देवाघरी गेले. बहीण लग्न होऊन सासरी गेलेली. तेव्हापासून तो निराधार झाला. मला सारे आठवताच मी त्याला एवढ्या गर्दीतही मिठी मारली. जणू आठवणींचा बांधच फुटावा. गेली ६०-७० वर्षे डोळ्यात गोठलेले अश्रू आज अचानक वितळले. मधू अर्धवट शिक्षण सोडून मामाच्या गावाला गेला. तिथे मोलमजुरी करून त्याने कुटुंबाचा संसार कसाबसा चालवला पण तो तिथे रमला नाही. तो परत पुसदला कायमचा आला. त्याला पत्नी व २ मुली असून जीवनाचं रहाटगाडगं कसंबसं चालू आहे. त्याला धरून मी लगेच जबरदस्तीने दुकानओळीत गेलो त्याच्यासाठी शर्ट-पॅंट, वहिनीबाई साठी साडी, २ मुलींना ड्रेसेस व मिठाई चे पुडे हाती देऊन मी त्याच्या स्वाधीन केले. या गडबडीत माझा खिसा रिकामा झाल्याचे कळलेच नाही आणि त्या आठवणींच्या बालपणीच्या आठवणीत स्वतःला विसरून त्याला पुन्हा भेटशील हं असं म्हणून मी घरी परतलो.

माधव पाटील

Leave a Reply