जिल्हा परिषदेत महिला लिपिकाचा कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस

नागपूर : ४ नोव्हेंबर – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकरांकडून घोटाळे, गैरव्यवहारांना आळा घालण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे घोटाळे समोर येत आहेत. एका कनिष्ठ महिला लिपिकाने मृतकांच्या नावाची पेंशन जवळच्या मंडळींच्या बॅंक खात्यात वळती करून कोट्यवधींचा घोटाळा केल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासामधील आतापर्यंतच हा सर्वात मोठा घोटाळा असणार आहे.
या महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करून चौकशी समिती गठित करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते.
नेवारे असे महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेकडे शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पेंशनची प्रकरणे हाताळण्याचे काम होते. सेवानिवृत्तीनंतर मृत पावलेले कर्मचारी ‘हयात’ (जिवंत) असल्याचे दाखवीत त्यांची पेंशन आपल्या जवळील व्यक्ती, मित्र, नातेवाईक यांच्या खात्यात वळती करीत होत्या.
हा प्रकार गेल्या सात, आठ वर्षापासून सुरू असून घोटाळ्याची रक्कम कोट्यवधीच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या अनेक महिन्यांपासून महिला कर्मचारी हे रजेवरही गेली आहे. त्यामुळे तिचे काम दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे वर्ग करण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्याला मोठा संशय आला. त्यामुळे हे प्रकरण समोर आले.
संबंधित महिला कर्मचारी साठ वर्षापासून एकाच पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे. नियमानुसार एका कर्मचाऱ्याकडे तीन ते पाच वर्षापेक्षा जास्त काळ एक टेबल (काम) राहता कामा नये. त्यानंतरही बीडीओंकडून कुठलीही कारवाई करण्यात आली. संबंधित महिला कर्मचाऱ्याचा रजेचा अर्जही नसल्याचे सांगण्यात येते. असे असताना बीडीओंकडून कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर शंका व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत बीडीओ जाधव यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्याचे टाळले.
मोठा गैरव्यवहार असल्याचे शिक्षण विभागाकडून आलेल्या अहवालातून दिसते. या अहवालाच्या आधारे संबंधित महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून चौकशी समितीही गठित करण्यात आली. समिती अहवाल आल्यावर पुढील कारवाई निश्चित करण्यात येईल.
-योगेश कुंभेजकर, सीईओ, जि. प.

Leave a Reply