किती आणि कोणते प्रकल्प महाराष्ट्रात आणणार याची यादी द्या – अजित पवार

अहमदनगर : ४ नोव्हेंबर – शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशामुळेचं प्रकल्प राज्याबाहेर गेले असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आजपासून दोन दिवसांचे चिंतन शिबीर शिर्डीत होणार आहे. या शिबीरासाठी अजित पवार शिर्डीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर टीका केली. दीड-दीड लाख मुला मुलींना रोजगार मिळणार होते, असे प्रकल्प बाहेर गेले आहेत. आता सांगतात की दुसरे प्रकल्प आणणार आहोत. किती आणि कोणते प्रकल्प महाराष्ट्रात आणणार याची यादी द्या असे आव्हान देखील अजित पवार यांनी यावेळी दिले.
सध्या देशात आणि राज्यात बेरोगजारी वाढत आहे. गेल्या महिन्याचा सर्वे बघितला तर समजेल की बेरोजगारीनं कळस गाठला असल्याचे अजित पवार म्हणाले. विविध विभागाच्या ठिकाणी मंत्री जात आहेत आणि लेटर देत आहेत असं राज्यात कधीच घडलं नव्हतं असेही अजित पवार यावेळी म्हणाले. प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं तरुणांच्या मनात रोष आहे. कारण त्यांना मिळणारे रोजगार बाहेर गेले आहेत. तरुणांच्या नाराजीचा फटका बसू नय म्हणून काहीतरी दिखावा करण्याचा सरकारचा केविलपणा प्रयत्न असल्याचे अजित पवार म्हणाले. राज्यातून प्रकल्प बाहेर गेल्याची सल नेत्यांच्या मनात आहे. त्यामुळेच ते रोजगार मेळावे घेत असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
हे सरकार फक्त घोषणा करत आहे. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या काळात सरकारनं शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे. मात्र, शेतकऱ्यांना मदत देतील असे वाटत नाही, असे अजित पवार म्हणाले. पंचनामे करण्यासाठी जाणारे अधिकारी पैसे मागत असल्याचे अजित पवार म्हणाले. आजही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी आहे. शेतकऱ्यांच्या खिशात सध्या पैसे नसताना अधिकारी पैसे मागत असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
सरकारच्या बाबतीत मी सुरुवातीला देखील सांगितले होते, परत मी आज देखील सांगत आहे की, जोपर्यंत 145 सदस्यांचा आकडा एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे आहे, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्या दिवशी 145 चा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार पडेल असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

Leave a Reply