औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

सोलापूर : ४ नोव्हेंबर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी 4 वेळा मुख्यमंत्री म्हणून आषाढीची शासकीय महापूजा केली आहे. आता त्यांना प्रथमच कर्तिकीचा मान मिळाला आहे. मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला.
औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले. पन्नास वर्षांपासून वारी करणाऱ्या साळुंखे कुटुंबाला विठ्ठल पावला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्रीमधील शेतकरी कुटुंबातील उत्तमराव यांना आज उपमुख्यमंत्री यांच्यासोबत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाली.
साळुंखे दाम्पत्याने विठूरायाची महापूजा करण्याची संधी मिळूनही स्वतःसाठी काही न मागता राज्यातील सर्व शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी विठू-रखूमाईला साकडं घातलं आहे. यावेळी मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे, कलावती साळुंखे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार उपस्थित होते.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात विविध देशी आणि विदेशी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी मोगरा, जरबेरा, आष्टर, झेंडू, गुलाब,कॉनवर अशा विविध देशी विदेशी 30 प्रकारच्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विठ्ठल रूक्मिणीचा गाभारा, सोळखांबी, प्रवेशद्वार, सभामंडप आदी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील भाविक राम जाभुळकर यांनी ही मोफत सजावट केली आहे. फुलांच्या सजावटीने देवाचे रूप खुलले आहे.

Leave a Reply