…वार-पलटवार – विनोद देशमुख

मजवरि धरि अनुकंपा…

सरकारी नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्याचं निधन झाल्यास त्याच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची पद्धत आहे. परंतु, ही अनुकंपा सहजासहजी पदरात पडण्याचा लोकांचा अनुभव नाही. याउलट, राजकारणात मात्र, विद्यमान खासदार किंवा आमदाराचं निधन झालं की, लगेच सहा महिन्यात पोटनिवडणुकीत मृताच्या पत्नीला/पतीला, मुलाला, मुलीला वा अन्य कुटुंबीयाला तिकीट देऊन निवडून आणलं जातं. ही राजकीय घराणेशाहीला खतपाणी देणारी पद्धत आता सर्वच पक्षांमध्ये रूढ झाली आहे. लोकांच्या सहानुभूतीचा फायदा घेण्यासाठी !
अनुकंपा तत्त्वाचा सर्वाधिक आणि झटपट लाभ सेवेकरी कामकऱ्यांपेक्षा राजकीय क्षेत्रातील लोकांनाच मिळतो, असा सार्वत्रिक अनुभव आहे. अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सध्या चर्चेत आहे. आमदार स्व. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उद्धवसेनेनं उमेदवारी दिली. त्यांना अविरोध निवडून आणण्यासाठी भाजपानं त्यांचा उमेदवार मागे घ्यावा, यावरून बरंच महाभारत झालं. कोणी पत्र लिहिलं, कोणी आवाहन केलं. आता त्यांच्यातच श्रेयाची लढाई सुरू झाली आहे, हा भाग वेगळा.
लटकेताईंना आमदारपदासाठी लाख शुभेच्छा. पण, यानिमित्तानं अनुकंपेचा प्रश्न ऐरणीवर आला, हेही नाकारता येणार नाही. खासदार-आमदार यांना आणि त्यांच्या पश्चात पत्नी/पतीला घसघशीत पेन्शन दिली जाते. लटकेताई स्वत: मुंबई महापालिकेच्या सेवेत होत्या. असे असताना, त्यांना अनुकंपा उमेदवारी देण्याची गरज होती काय, असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात आला, तर त्याला दोष देता येईल काय ? हा प्रश्न फक्त लटकेताईंपुरता मर्यादित नाही. अशा प्रकरणांमध्ये असंच वागणाऱ्या इतरही राजकीय पक्षांना तो लागू आहे. आपल्या व्यवस्थेत राजकारण किती हावी आणि स्वार्थी झालं आहे, त्याचंच हे उदाहरण. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपेसाठी उंबरठे झिजवावे लागतात आणि राजकीय नेत्यांच्या घरात मात्र ती सहज उपलब्ध करून दिली जाते. हा कुठला न्याय ? ही कुठली समानता ? ही कुठली लोकशाही ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेले आहेत.
अंधेरी (पूर्व) निवडणुकीनिमित्त आणखी दोन प्रश्न विचारले जात आहेत. लटकेताईंचा राजीनामा मंजूर करण्याचा घोळ कोणी अन् का केला ? भाजपानं ऐनवेळी माघार का घेतली ? राजीनामा-रामायणामुळे लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास उडण्यास हातभार लागू शकतो. हे चुकीचंच घडलं आहे. भाजपाच्या माघारीवर त्या पक्षाच्याच कार्यकर्त्यांमध्ये, सहानुभूतिदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. कसली महाराष्ट्राची संस्कृती ? अशीच स्थिती असलेल्या पंढरपूर, कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुका भाजपानंच लढल्या, तेव्हा कोणालाच संस्कृती आठवली नाही. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीविरुद्ध (प्रीतम मुंडे-खाडे) बीड लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करताना काॅंग्रेसनं संस्कृती पाळली का ? अन् यावेळी अचानक प्रत्येकाला संस्कृतीचा आठव ! हाच आपल्या राजकीय व्यवस्थेतील दोगलेपणा आहे. आता काम झाल्यावर भाजपाविरोधक संस्कृतीचा मुद्दा बाजूला सारून, “तुम्हाला कसं नमवलं, तुम्ही घाबरलात, तुम्ही सुटका करून घेतली” वगैरे सांगत शेखी मिरवत आहेत. यापेक्षा लढून पराभव पत्करणं भाजपाला जास्त परवडलं असतं. कारण, मुंबई मनपा निवडणुकीचा सराव तरी झाला असता. त्याऐवजी झालं काय ? गाढवही गेलं अन् ब्रह्मचर्यही गेलं

विनोद देशमुख

Leave a Reply