सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

शिवधनुष्य ते मशाल ढाल-तलवार ते शिवधनुष्य

प्रचंड गदारोळ – प्रचंड गदारोळ – प्रचंड गदारोळ – अटीतटीच्या निवडणूक चुरशीत भाजपाने आपला उमेदवार मागे घेतला आणि महाराष्ट्रात हाहाकार माजला.
ऋतुजा लटकेला पहिले राजीनाम्यात लटकवलं, तिच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला गेला, मग तिला शिंदे गटात खेचायचा प्रयत्न झाल्याच्या वावड्या उठल्या, शेवटी न्यायालयातून ऋतुजा लटकेंचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आणि हाती मशाल घेऊन ऋतुजा लटकेंनी आपला निवडणूकीचा अर्ज सादर केला. सबकुछ नाटक! पण कोणाचे?
इकडे शिंदे शिवसेना – भाजपा मध्ये उमेदवार देण्यासाठी खलबतं झालीत. शेवटी ना तुझा ना माझा एक अपक्ष बळीचा बकरा “मुरजी पटेल” उभा केला गेला.
आता गंमत बघा – सगळा खेळ मजेशीर आहे. शिंदे गट शिवसेना ने आपला उमेदवार का नाही दिला? ढाल-तलवार ह्या चिन्हावर? भाजपा कडे काय उमेदवार नाहीत अंधेरी मध्ये उभे करण्यासाठी? मग अपक्ष का निवडला?
एकदम राज ठाकरेंची सर्व मंडळी भेट घेतात आपले शेलार मामा वैयक्तिक भेट घेतात. मग राज ठाकरे एक पत्र देतात. की महाराष्ट्राची संस्कृती वगैरे वगैरे . आधाशी हपापलेले शिवसेना (ऊबाठा) लगेच मोडलेल्या धनुष्याची प्रत्यंचा मशालीवर ताणून धरते. एक आमदार अनायास मिळतोय म्हटल्यावर शिवसेना (ऊबाठा) च्या तोंडी लगेच लाळ गळाया लागते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना घेरायला राज ठाकरेंनी कशी कुरघोडी केली? दोन चुलत भावांच्या मिलनाची ही पर्वणी काय? आता ऊद्धव – राज एकत्र येणार का? अचानक महाराष्ट्र संस्कृती चा उमाळा कसा काय उचकला? दोन दिवस तर मिडियाला जणू एक मोठा मुद्दा सापडलेला. तेवढ्याच् शांतपणे फडणवीसांनी गिल्ली टोलवली – कोणताही निर्णय घ्यायचा तर पक्षश्रेष्ठींना विचारल्याशिवाय आम्ही निर्णय घेवू शकत नाही. शिवाय शिंदे गटाला विचारावे लागेल. म्हणजे परिस्थिती अशी बनविली गेली जणू ही निवडणूक चुरशीची होणार. बहुत सारे अपक्ष उभे केले गेले. शेलार – शरद पवार भेटीचे दाखले दिले गेले. ऋतुजा लटकेला हरविण्याचा चोख बंदोबस्त केला गेला.
पेडणेकर, अंधारे, राऊत ह्यांना जणू पर्वणीच होती भाजपावर तोंडसुख घेण्याची. पहिला दिवस सर्वांनी भाजपाला ज्ञान पाजले संस्कृती चे. संस्कृती नुसार भाजपा ने आपला उमेदवार उभा करायला नको. बरे! गंमत म्हणजे सर्व मंडळी राज ठाकरेंच्या पत्राचे कौतुक करण्यात गुंतलेली. शरद पवार, सुळे ताईंनी पण आपले संस्कृती पर सुळे मिडिया ला दाखविलेले. की दिवंगत आमदाराच्या पत्नीला आमदार बनविले तर काय होणार? महाराष्ट्राची संस्कृती वगैरे वगैरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे ह्यांना आजपर्यंत राजकारण कशाशी खातात कळलेले नाही. संजय राऊत तर येडचाप गडी, एक ही निवडणूक न लढलेला. सगळे बह्याडासारखे भाजपाच्या मागे लागले की पटेलांचा उमेदवारी अर्ज मागे घ्या मागे घ्या.
आणि गंमत म्हणजे फडणवीसांनी पटेलांचा अर्ज मागे घेतला. राजकारणातील गोम कोणाला कळलीच नाही.
आता सगळे भरभरून भाजपा ला उमेदवारी मागे घेतल्याबद्दल शिव्या घालताहेत. भाजपा पळपुटा म्हणून दुषणे देताहेत. अंधेरी मध्ये हार निश्चित म्हणून भाजपा ने हा मार्ग स्वीकारला असे काहीशी बडबड चालली आहे. आणि आताशा आपली भुमिका गुप्त ठेवणारे फडणवीस विरोधकांना न समजणारी खेळी खेळून मजा घ्यायला लागले आहेत. शरद पवारांसारख्या दिग्गज राजकारण्यापुढे त्यांची उंची अजून वाढवली आहे. शरद पवार आता फडणवीसांना मानायला लागले आहे. फडणवीसांचे संवैधानिक आकलन आणि राजकारणातील आकडेमोड काहीतरी वेगळ्या पद्धतीने यश देऊन जाते. हे आता पियुश गोयल पासून सर्व मंडळी मान्य करतात.
अर्ज मागे घेतला आणि मिडियावर उड्या पडल्या की भाजपा ने आपली हार मानली, आमची मविआ युती बळकट. नाना पटोलेंनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला. कॉंग्रेस ने आपला उमेदवार मुद्दाम उभा नाही केला. कारण ही सर्व मंडळी भाजपा शी आतुन पॅक होती. मित्र मित्र म्हणविणारी मविआ कॉंग्रेस आणि राकॉं ह्या सर्व धुर्त मंडळींना उद्धव ठाकरेला संपविण्याचा प्रण घेतलेला. ती मंडळी ही शेवटची निर्णायक संधी कशी सोडतील?
पेडणेकर, अंधारे, संजय राऊत, सावंत, विनायक राऊत – सर्व मंडळी भाजपा ला पराभव दिसला म्हणून उमेदवारी मागे घेतली ह्या जल्लोषात होती आणि फडणवीसांच्या चतुरस्त्र राजकारणाला बळी पडली.
वाचक मित्रांनो! फक्त भाजपाने आपला उमेदवार मागे घेतला नाही तर सर्व अपक्ष उमेदवार वर्गाने आपली उमेदवारी मागे घेतली आणि “मशाल” चिन्हावर शिवसेना (ऊद्धव बाळासाहेब ठाकरे) ह्या निर्विरोध जिंकुन येणार. आणि इथे ऊद्धवाची शिवसेना भस्सम होणार. “मशाल” ह्या निवडणूक चिन्हाला कायम चिकटणार.
“धनुष्यबाण” चिन्ह तात्पुरते गोठवले आहे. कायमचे नाही. म्हणून शिंदे शिवसेनाने आपला उमेदवार दिला नाही. नव्याची नवी नवलाई आणि मशाल चिन्हावर लटके ताई निवडून आली. हे दाखविण्याची घाई उद्धव ठाकरे गटाला झालेली. भाजपा च्या माघारी परतण्याचा उत्सव ठाकरे गटाने साजरा केला इथे ठाकरे गट न्यायालयीन चौकटीमध्ये फसला.
कारण मीमांसा अशी – अर्थात एक विश्लेषण आहे.
“धनुष्यबाण” सध्या तात्पुरते गोठविलेले निवडणूक चिन्ह. मशाल आणि ढाल-तलवार हे चिन्ह सुद्धा तात्पुरते दोघांना दिलेले. कोर्टाचा निर्णय येतपर्यंत. ऋतुजा लटके ह्यांनी पुरजोर जोर लावला, उद्धव सेनेनी Emotional Card खेळल्याचा आविर्भाव आणला. त्यात भाजपा ला कसे फशी पाडले ह्याचे अनावर आनंदाश्रू ठाकरे गटाच्या नेत्रात तरळले, जल्लोष जाहला विजयश्री चा आणि भाजपा ने सत्यापित केले की……… मशाल चिन्हावर शिवसेना ऊद्धव गटाने बाजी मारली. म्हणजे कोर्टात ज्यावेळी गोठवलेले “धनुष्यबाण” निवडणूक चिन्ह सोडविले जाईल त्यावेळी ते कोणाला मिळेल? अर्थात शिंदे गटाला कारण त्यांनी दिलेला “ढाल-तलवार” अजून एकसुद्धा उमेदवार आमदार झाला नाही तर “मशाल” चिन्हावर एक उमेदवार आमदार झाला आहे. आता हे निवडणूक चिन्ह ठाकरे गट शिवसेनेसाठी नेहमी करता झाले. आणि हा युक्तिवाद न्यायालयात किंवा निवडणूक आयोगासमोर ग्राह्य धरला जाईल. आणि धाराशाई झालेला ऊद्धव गट “धनुष्यबाण” निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे आल्यावर नेहमी करता गाडला जाणार, एवढे निश्चित.
राजकारण हे रक्तात हवे ते ऊद्धव ठाकरे ह्यांच्या रक्तात नाही. आदित्य ठाकरे तर फडणवीसांसमोर अंड्यातील पिल्लू. अशा लोकांच्या हातातील सत्ता म्हणजे ” माकडाच्या हाती कोलीत”. विश्वासघाताचा बदला म्हणा की वचपा म्हणा कसा काढायचा हे परत एकदा फडणवीसांनी दाखवून दिले आहे. राजकारणातून ऊद्धव गटाला सळो की पळो करुन सोडले आहे एवढे निश्चित.

भाई देवघरे

Leave a Reply