संपादकीय संवाद – दक्षिणेतही हिंदीला स्वीकृती मिळवण्यासाठी राष्ट्रीय पक्षांनी प्रयत्न करणे गरजेचे

तामिळनाडू विधानसभेत केंद्र सरकारने देशभरात हिंदीचा आग्रह धरल्याप्रकरणी विरोध करत हिंदीच्या सक्तीला विरोध करणारा ठराव पारित केल्याची बातमी आहे. भारतीय संघराज्य संकल्पनेत कुठेतरी तडा जाणारी ही घटना मानावी लागेल.
आज भारतात जवळजवळ ३६ राज्ये आहेत, उत्तर भारत आणि मध्य भारतातील काही राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलली जाते. इतर राज्यांमध्ये त्या त्या राज्यांच्या स्थानिक भाषा आहेत. बहुतेक सर्व राज्यांनी आपल्या स्थानिक भाषेसोबत हिंदी ही संपर्क भाषा म्हणून स्वीकारलेली आहे. मात्र दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आंध्र आणि तेलंगणा या राज्यांनी सुरुवातीपासूनच हिंदीला विरोध केला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेत आलेल्या नेहरू सरकारने हिंदी ही संपर्क भाषा म्हणून स्वीकारली होती, तेव्हापासून आजतागायत दक्षिणेतील राज्यांनी हिंदीला विरोध करण्याचीच भूमिका घेतली आहे, त्यांनी हिंदीपेक्षा इंग्रजीला जास्त महत्व दिले, इंग्रजी ही परकी भाषा असूनही त्यांना भारतीय भाषेपेक्षा जवळची वाटली. हे या देशाचे दुर्दैवच मानावे लागेल.
आतापर्यंत सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारने कधीही स्थानिक भाषेला विरोध केला नाही, स्थानिक भाषेसोबत अन्य प्रांतातील नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी हिंदीचा उपयोग व्हावा, असा त्यांचा आग्रह होता. मध्य भारतातील गुजरात, महाराष्ट्र पूर्वेतील बंगाल, ओरिसा, पूर्वोत्तर भागातील आसाम, मेघालय या सर्वच प्रांतांनी स्थानीक भाषेबरोबर हिंदीही स्वीकारली. मात्र दाक्षिणात्य आजही अडून बसले आहेत. देशात शिक्षणासाठी विशेषतः उच्च शिक्षणासाठी आणि शासकीय व्यवहारासाठी हिंदीचा उपयोग व्हावा हा केंद्राचा आग्रह आहे. त्याला होणारा हा दाक्षिणात्य विरोध चिंताजनकच म्हणावा लागेल.
अश्या प्रकारे विरोध होऊ नये, यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. देश एकसंघ ठेवायचा असेल तर स्थानी भाषेचे महत्व कायम ठेऊन हिंदीला देखील सन्मानाचा दर्जा कसा देता येईल? यासाठी व्यापक प्रयत्न व्हायला हवेत. हे काम राष्ट्रीय पक्षाचे नेतेच करू शकतात, ज्यावेळी तामिळनाडू विधानसभेत या प्रस्तावावर मतदान झाले, त्यावेळी राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपने सभात्याग केल्याची बातमी आहे. हे शुभचिन्ह मानावे लागेल. भाजपने आणि भाजपसोबत काँग्रेस सारख्या इतर राष्ट्रीय पक्षांनी या बाबतीत पुढाकार घ्यायला हवा. आणि देशभरात हिंदीला सन्मान मिळवण्यासाठी पक्षभेद बाजूला ठेऊन प्रयत्न करायला हवे, ही आजची गरज आहे हे नक्की.

अविनाश पाठक

Leave a Reply