बुलढाणा : १८ ऑक्टोबर – जिल्ह्यात अपघाताचे सत्र थांबता थांबत नसल्याचं दिसतंय. ऑटो आणि आयशरच्या धडकेत शहा कुटुंबावर काळाने घाला घातला. बुलढाण्यातील या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघा जणांना प्राण गमवावे लागले. बहिणीला घेण्यासाठी गेलेल्या भावाच्या वाहनाला अपघात झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
बुलढाणा तालुक्यातील माळवंडी येथील बहिणीला घेऊन येत असलेल्या भावाच्या ऑटोला 17 ऑक्टोबर रोजी माहोरा गावाजवळ भरधाव आयशरने धडक दिली. यामध्ये शहा कुटुंबातील चौघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. गावाकडे येण्याच्या बहिणीचा आनंद काही क्षणातच दुःखात बदलला. या अपघातात ऑटो चालकही ठार झाला आहे. तसेच शहा कुटुंबातील एका चिमुकलीसह दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
देऊळगाव राजा येथील कैफ अश्फाक शहा हे मित्र मनीष तिरुखे यांच्या ऑटो रिक्षा क्रमांक एम एच २८ बीए ०२५६ ने बुलढाणा तालुक्यातील मालवंडी येथील बहिणीला घेण्यासाठी 17 ऑक्टोबर रोजी गेले होते. तेथून बहिणीला तिच्या मुलासह घेऊन ते देऊळगाव राजाकडे येत होते. शहा कुटुंबात हे माहोरा गावानजीक असताना त्यांच्यातील चार सदस्यांवर काळाने झडप घातली.
जाफराबाद कडून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच २८ जीबी 23 57 ने शहा कुटुंबाच्या ऑटोला धडक दिली. यामध्ये परविन बी राजू शहा (वय वर्ष 25), आलिया राजू शहा (वय वर्ष सात), मुस्कान राजू शहा (वय वर्ष 3), कैफ अश्फाक (वय वर्ष 19) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर बाळू खरात व सानिया शहा हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या भीषण अपघातामुळे देऊळगाव आणि माळवडी गावात शोककळा पसरली आहे जखमीवर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत