एनआयएचे उत्तर भारतात ५० पेक्षा अधिक ठिकाणांवर छापे

नवी दिल्ली : १८ ऑक्टोबर – राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने मंगळवारी उत्तर भारतात वेगवेगळ्या ५० पेक्षा जास्त ठिकाणांवर छापेमारी केली आहे. स्थानिक गुन्हेगारी टोळींचे वाढते प्रस्थ रोखण्यासाठी तसेच दहशतवाद्यांशी त्यांच्या कथित संबंधाची चौकशी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एनआयएने पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली, दिल्ली राजधानी परिसर (एनसीआर) येथे कारवाई करण्यात आहे. स्थानिक गुन्हेगार, गुन्हेगारी टोळी यांचा दहशतवाद्यांशी असलेला संबंध तसेच ड्रग्ज तस्करी यांचे पसरलेले जाळे रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. याआधीही एनआयएने भारतभरात वेगवेगळ्या ६० ठिकाणांवर छापेमारीची कारवाई केली होती. या गुन्हेगारी टोळींकडून सायबरस्पेसचा वापर केला जायचा.
स्थानिक गुंड आणि दहशतवाद्यांची चौकशी करण्यासाठी या वर्षी २६ ऑगस्टपासून चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यासाठी दिल्ली पोलिसांनी दोन गुन्ह्यांची नोंद केली होती. या गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर एनआयएकडून ही कारवाई केली जात आहे. या कारवाईत एनआयएने गुन्हेगारी तसेच दहशतवादी कारवायांचे नेतृत्व करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

Leave a Reply