शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ६ नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलन

वाशीम : १७ ऑक्टोबर – यावर्षी अतिवृष्टी, परतीचा पाऊस यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला. शेतकरी सर्वबाजूने अडचणीत सापडला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याऐवजी वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सुरुवात बुलडाणा येथून ६ नोव्हेंबर रोजी आयोजित एल्गार मोर्चातून करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली. स्थानिक विश्राम भवन येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही, विरोधक सोयाबीन – कापसावर बोलायला तयार नाही. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, सोयाबीनला किमान प्रतिक्विंटल ८ हजार ७०० रुपये आणि कापसाला प्रतिक्विंटल १२ हजार ७०० रुपये भाव द्यावा, पीककर्जासाठी सीबीलची अट रद्द करावी, या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन केले जाणार असून आंदोलनाची सुरूवात बुलढाणा येथील ६ नोव्हेंबर रोजीच्या एल्गार मोर्चाने होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष दामोदर इंगोले, केशव तोंडे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply