२ हजार किलोचा चिवडा बनवून विष्णू मनोहर घालणार नव्या विक्रमला गवसणी

नागपूर : १६ ऑक्टोबर – दिवाळी आता काही दिवसांवरच आलेली आहेत. त्यामुळे आता अनेक ठिकाणी दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. दिवाळी म्हटलं की, सर्वात आधी फराळ आठवतो. लाडू, चिवडा, चकली आणि बरेच फराळाचे पदार्थ यावेळी बनवले जातात. यातच आता नागपूरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नागपुरात आज नवीन विक्रम घडत आहे आणि हा विक्रम चिवड्याशी संबंधित आहे.
प्रसिद्ध शेफ मनोहर विष्णू हे आज नवा विक्रम रचत आहेत. मनोहर विष्णू आज एकाच कढईत तब्बल दोन हजार किलोंचा चिवडा बनवत आहेत. या चिवडा बनवण्यास सुरुवातही झाली आहे. त्यामुळे अवघ्या काही तासातच मनोहर विष्णू यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवला जाणार आहे. या विक्रमाकडे नागपुरसोबतच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
विशेष म्हणजे हा संपूर्ण चिवडा आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ म्हणून दिला जाणार आहे. विष्णू मनोहर स्वतः हा चिवडा बनवत असून याठिकाणी ही पाककृती पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे. विष्णू मनोहर यांनी मदतीसाठी काही लोकही घेतले आहेत. चिवड्यासाठी लागणारं सगळं साहित्य टाकून ते स्वतः आदिवासी बांधवांसाठी खास चिवडा बनवत आहेत.
सगळ्यात विशेष बाब म्हणजे खाद्य दिनाच्या निमित्ताने हा चिवडा तयार झाल्यानंतर तो विकण्यात येणार नाही. तर, हा चिवडा गडचिरोली आणि मेळघाटच्या दुर्गम भागातील आदिवासींना दिवाळी फराळ म्हणून वाटला जाणार आहे. नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते या चिवड्याचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी आधी याचे पॅकेट तयार केले जातील. नागपुरात पहिल्यांदाच एकदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात चिवडा बनवला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली आहे. अनेकजण इथे फोटो आणि व्हिडिओ काढून पोस्टही करत आहेत.

Leave a Reply