संत्रा उत्पादकांनी केला निंबुवर्गीय संशोधन केंद्राच्या संशोधकांचा दशक्रिया विधी

अमरावती : १६ ऑक्टोबर – अमरावती येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी निंबुवर्गीय संशोधन केंद्राच्या संशोधकांचा दशक्रिया विधी घातला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी संत्रा पिकांवरील फळगळतीची समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्राला वारंवार निवेदने दिली. परंतु अद्याप कोणत्याही प्रकारचं संशोधन झालं नाही.
याच्या निषेर्धात शेतकर्यांनी अमरावती जिल्ह्याच्या चांदुरबाजार तालुक्यातील शेतातील संत्रा झाडे जेसेबीने तोडून बाग भूईसपाट केली आहे. तसेच बागेतच निंबुवर्गीय संशोधन केंद्राच्या संशोधकांचा दशक्रिया विधी पार पाडला. तसेच संकेतात्मक म्हणून बागेतील संत्रा झाडे तोडून ‘मुंडन’ केलं आहे. संशोधकांचा जिवंतपणीच दशक्रिया विधी केल्याने परिसरात घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
आपल्या समस्या मांडताना शेतकरी आशिष बंड म्हणाले की, आम्ही गेल्या सात वर्षांपासून एनआरसीकडे धाव घेऊन वारंवार संशोधनाची मागणी करत आहोत. पण एनआरसी त्यामध्ये निष्क्रिय ठरलेली आहे. त्यांना वारंवार सूचना देऊनही संशोधन करण्यात आलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांचा दशक्रिया विधी पार पाडत आहोत. हा दशक्रिया विधी पार पाडल्यानंतर एनआरसी नावाचा पांढरा हत्ती नष्ट होणार आहे.
मी मागच्या वर्षी माझ्या शेतातील झाडं तोडली होती. यावर्षीही मी ३५० झाडं तोडणार आहे. याशिवाय गावातील साडेचार हजार झाडं तोडण्यात येणार आहेत. झाडं तोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या १४ दिवसांत सगळी झाडं तोडली जाणार आहेत, अशी प्रतिक्रिया शेतकरी आशिष बंड यांनी दिली.

Leave a Reply