न्यायदानातील विलंब भारतीय नागरिकांसमोरील सर्वात मोठय़ा आव्हानांपैकी एक – पंतप्रधान मोदी

केवडिया : १६ ऑक्टोबर – ‘‘न्यायनिवाडय़ास होणारा विलंब हा देशासमोरील सर्वात मोठय़ा आव्हानांपैकी एक आहे. विश्वासार्ह आणि द्रुतगतीने न्याय देणारी न्यायव्यवस्था ही समाजाचा आत्मविश्वास आणि देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे,’’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केले. येथे होत असलेल्या विधिमंत्री व विधी सचिवांच्या अखिल भारतीय संमेलनाच्या उद्घाटन सत्रात दूरदृश्यप्रणालीद्वारे मोदी बोलत होते.
मोदी म्हणाले, की विनाविलंब न्याय मिळत असल्याचे अनुभवल्यानंतर नागरिकांचा संवैधानिक संस्थांबाबतचा विश्वास आणखी दृढ होण्यास मदत होते. त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासही चालना मिळते. न्यायदानातील विलंब हा भारतीय नागरिकांसमोरील सर्वात मोठय़ा आव्हानांपैकी एक आहे. आमची न्यायव्यवस्था या संदर्भात गांभीर्याने काम करत आहे. न्यायदानातील विलंबावर समाधानकारक उपाय शोधताना वादांवर निर्णय देणाऱ्या पर्यायी व्यवस्थांचा विचार होऊ शकतो.
आपल्या गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात आपण सायंकालीन न्यायालयांचा प्रारंभ केला होता व त्यात यश मिळाल्याचे सांगून मोदी म्हणाले, की त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचत असे. पंतप्रधान मोदींनी या वेळी अनेक देशांची उदाहरणे देत भारतातही कायद्यांचा प्रभावीपणा कायम राखण्याची मुदत निश्चित केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply