नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समितींपैकी १२ वर महाविकास आघाडीचा झेंडा

नागपूर : १६ ऑक्टोबर – पुरेस संख्याबळ नसताना जिल्हा परिषद ताब्यात घ्यायला निघालेल्या भाजपला पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीत पराभवाचा जोरदार धक्का बसला. महाविकास आघाडीने १३ पैकी १२ जागा जिंकल्या असून ग्रामीण भागात आपलेच वर्चस्व असल्याचे काँग्रेसने दाखवून दिले.
अनेक वर्षांपासून नागपूरच्या ग्रामीण भागाचे नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे करीत आहे. पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात चांगलाच दबदबा निर्माण केला होता. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री आहेत. दोन बडे नेते जिल्ह्यात असताना झालेला पराभव भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे.
जिल्ह्यातील १३ पंचायत समितीपैकी काँग्रेस ९, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि शिवसेना १ जागेवर विजयी झाली. भाजपला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले. उमरेड, कुही, भिवापूर, कामठी, मौदा, रामटेक,पारशिवनी, सावनेर, कळमेश्वर, हिंगणा, नागपूर (ग्रामीण), काटोल, नरखेड या तेराही तालुक्यात पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुका पार पडल्या.

Leave a Reply