वर्धा : १४ ऑक्टोबर – वर्धेच्या महावीर उद्यानात कार्यरत असले्ल्या महिला सुरक्षा रक्षकावर तेथेच काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने एकतर्फी प्रेमातून अँसिड फेकले. या घटनेत महिला जखमी झाली असून तीला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेतील आरोपी सुरक्षा रक्षकाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. अर्जून चाफले (५२) रा. असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.
अजूर्न चाफले हा शहरातील महावीर बालोद्यानात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीवर होता. याच उद्यानात ४२ वर्षीय पीडिताही नोकरीवर होती. एकतर्फी प्रेमातून मद्यधूंद असलेल्या अर्जून चाफले याने उद्यानातच पीडितेच्या शरीरावर बाथरूममध्ये वापरल्या जाणारा ऍसिड सदृश दाहक पदार्थ फेकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने लगेच ओढणी समोर केल्याने सुदैवाने तिला मोठी इजा पोहचली नाही. पीडितेच्या हातावर आणि पाठीवर दाहक पदार्थ फेकल्या गेल्याने तो भाग काही प्रमाणात भाजला आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पाहणी केली. सध्या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असून तिच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे.