वर्णद्वेषातून ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांची हत्या

नवी दिल्ली : १४ ऑक्टोबर – जागतिक स्तरावर वर्णद्वेषविरोधी लढ्याला मोठा इतिहास आहे. आजपर्यंत असंख्यवेळा हा लढा देण्यात आला आहे. मात्र, अजूनही काही देशांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये घडलेल्या ताज्या घटनेमुळे वर्णद्वेष २१व्या शतकातही अस्तित्वात असल्याचं स्पष्ट झालं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर वर्णद्वेषी हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुभम गर्ग असं या तरुणाचं नाव असून तो अवघ्या काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाला गेला होता. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका २७ वर्षीय संशयिताला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सगळा प्रकार सिडनीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. सिडनीच्या युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्समध्ये शुभम गर्ग मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडीचं शिक्षण घेत होता. शुभमं आयआयटी मद्रासमधून बीटेक आणि एमएससीचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढील शिक्षणासाठी तो ऑस्ट्रेलियाला गेला. एक सप्टेंबर रोजी शुभम सिडनीमध्ये दाखल झाला होता. मात्र, अवघ्या दोन आठवड्यांत त्याच्यावर हा हल्ला झाला.
शुभम गर्गवर हल्लेखोरानं चाकूचे ११ वार केल्याचं स्पष्ट झालं आहे. या हल्ल्यात त्याचा चेहरा, छाती आणि पोटावर गंभीर जखमा जाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. शुभमवर सध्या सिडनीमधील एका रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. शुभमचे कुटुंबीय आग्र्यामध्ये राहतात. हा हल्ला वर्णद्वेषातूनच करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे
या सर्व प्रकाराबाबत बोलताना शुभमचे वडील रामनिवास गर्ग यांनी वर्णद्वेषातून हल्ला झाल्याचं म्हटलं आहे. “शुभम किंवा त्याचे मित्र हल्लेखोराला ओळखत नव्हते. हा वर्णद्वेषातून करण्यात आलेला हल्ला दिसतोय. आम्ही भारत सरकारला विनंती करतो की त्यांनी आमची मदत करावी”, असं ते म्हणाले. यासंदर्भात शुभमच्या भावाला व्हिसा देण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच व्हिसा उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply