सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

आई, मी नक्की परत येईन..!!

शीर्षक वाचले नी वाचकांना भावना कळल्या. एका कोठडीतील गुन्हेगाराचे आपल्या आईला लिहीलेलं पत्र. “आई” सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय.
पण आईची खरी महती भारतवर्षात वाढविली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी. त्यांचे दर वाढदिवसाला व्यस्त वेळात वेळ काढून आईला भेटणे. तिला वाकुन पायाला हात लावून नमस्कार करणे. एक गोडाचा घास भरविणे आणि देशाचा पंतप्रधान असणाऱ्या व्यक्तिने आईच्या इवल्ल्याशा घरात प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून वाढदिवस साजरा करणे. “घर” ह्याला तुम्ही आईचे घर म्हणा किंवा स्वतः चे घर म्हणा पण आपण ज्या घरात राहतो त्या घराची प्रत्येक विट न् विट स्वकष्टार्जित असेल तर त्या घराला घर म्हणायचे. मग अशा आईची महती लोकांना विचार करायला भाग पाडते. अशी कुस एखाद्याच भाग्यवंताच्या भाग्याला येते. वीस वर्षे सतत उच्चपदावर आणि भ्रष्टाचाराचा, एक पैशाचा डाग नाही. ही शिकवण माणसाच्या अंगी सहज येत नाही. त्यासाठी घरातील सुसंस्कृत संस्कार, मायेची शिकवण असावी लागते. तेव्हा कुठशा माणूस भ्रष्टाचार करीत नाही. उच्चपदावर राहून देखील विरागी वृत्तीने कर्तव्य करतो. आठवतोय कॉंग्रेस काळातील दंगा ग्रस्त गुजरात आणि मोदींच्या काळातील प्रगत गुजरात! कां! तर हे संस्कार बालपणी आईकडून तर घराण्याकडुन येतात. मोदींचे संस्कार तर “न खाऊंगा” पर्यंत सिमित नाहीत तर ते म्हणतात “न खाने दुंगा” ! “बाळा भ्रष्टाचार करु नको, आणि इतरांनाही करु देवू नको” हे संस्कार घडवणारी माता, खरोखर धन्य म्हणावी लागेल. बरे! ह्याचा अर्थ की बाळा, तू तर भ्रष्टाचार करु नकोसच् पण इतरांनाही भ्रष्टाचार करण्यापासून वंचित कर. असे सुंदर ज्ञान देणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या मातेच्या चरणी शत् शत् नमन! अशा आईची कुस प्रत्येक जन्मी मिळाली तर प्रत्येक जण हर जन्मात म्हणेल की,”आई, मी नक्की परत येईन”!
वाचक मित्रांनो! एक क्षण विचार करा की भारतवर्षात आजच्या घडीला ३० करोड माता आहेत. (उदाहरणादाखल ३० करोड आकडा धरलाय) आणि ह्या ३० करोड माता समजा मोदींच्या आईसारख्या सुसंस्कृत आहेत ज्या मातांनी समजा ३० करोड मोदी सारखे पुत्र प्रसवले तर आज भारतवर्ष कुठल्या कुठे जाईल. भारतात पोलिसांची गरज भासणार नाही कारण १३० करोड पैकी ६० करोड (आई व मुले मिळून) न्यायिक मार्गाने चालणारे नागरिक असतील, भ्रष्टाचार विरोधी नव्हे तर इतरांचा भ्रष्टाचार रोखण्याची क्षमता असणारे असतील तर अशा देशात ईडी, सीबीआय, पोलिस सारख्या तत्सम सरकारी यंत्रणेची गरजच् भासणार नाही. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” म्हणतात. कां? कारण जर आई नाही तर संस्कार नाही. आणि संस्कृती हीन स्वामी म्हणजे “भिकारी”. आईची महती अगाध आहे कल्पनेपलिकडची आहे. मात्र आई ने प्रसविलेला पुत्र मात्र “ज्याचा तिन्ही लोकी झेंडा” असा हवा.
“मै विजय दिनानाथ चौहान पुरा नाम!” आठवतोय अमिताभ बच्चन! अग्निपथ मध्ये उभा केलेला गुंडा. पुत्र चांगला असो वाईट असो. कसा ही असो! त्याचा जीव आईसाठी मात्र तुटत असतो. संस्कार क्षम आई रोहिणी हट्टंगडी परिस्थिती मुळे वेळीच संस्कार देऊ शकली नाही म्हणून मुलगा वाहावत गेला, गुंडा झाला पण तशाही परिस्थितीत तो आईला दाखवायचा प्रयत्न करतो की मोठा गुंडा आहे, संस्कारक्षम लोकांपेक्षा माझ्यासमोर झुकणाऱ्या माणसांची रिघ आहे. आई बघ हा तुझा गुंडा बेटा किती महान आहे. त्यावेळी ती संस्कारक्षम आई विजय दिनानाथ चौहानला म्हणते की “बेटा! अपनी मां को खरीदने की कोशिश मत कर”! काय जुगलबंदी रंगली होती पडद्यावर दोघांची. अमिताभ बच्चन आणि रोहिणी हट्टंगडी दोघेही तोडीस तोड अभिनयामध्ये. पडद्यावर हे दृष्य बघताना आपल्या अक्षरशः अंगावर काटा येतो. तर विक्रम गोखले चा अभिनय त्याच्या डोळ्यातील जरब, वाक्याची फेक “तुम अपनी मौत के तरफ चल नही, बल्की दौड रहे हो!” इथे पडद्यावर जाणवते विक्रम गोखले समोर अमिताभ बच्चन अभिनयाच्या उंचीत थिटा पडतो.
पण गुंडा किती ही मोठा असला तरी त्याला आईचा पदर नेहमीच् हवाहवासा वाटतो. खास करून ज्यावेळी गुंड मुलगा एखाद्या संकटात सापडला असेल निघतानाचे मार्ग बंद असतील, एकाकी खोलीत जीव घुटमळत असेल. जामिन मिळत नसेल, अशावेळी आईची आठवण गुंड प्रवृत्तीच्या गुंड लोकांना येणे साहजिक आहे. एखादा गुंडा व्यक्त होतो तर एखादा गुंड पत्राद्वारे व्यक्त होतो. कोणताही चोर असो गुंड असो. कधी ही म्हणणार नाही की मी चोर आहे, मी गुंडा आहे. आणि जगाचा नियम आहे जो पकडा गया वो चोर. शरद पवारांना कोणी चोर म्हणू शकते का? नाही! कां नाही? कारण आमची सरकारी यंत्रणा कमकुवत असावी किंवा शरद पवार कायद्याची पळवाट काढण्यात सक्षम असावे किंवा शरद पवार पुर्ण स्वच्छ असावे. आणि राजकारणी लोकं उगीच गवगवा करीत असावे. तर सांगण्याचे तात्पर्य संजय राऊतांनी तुरुंगातून आपल्या आईला पत्र लिहीले आणि लोकशाही चा चौथा “दंभ” प्रसारमाध्यमे, वृत्त वाहिन्यांनी ते उचलून धरले. एका तुरुंगातील गुंडाचे आईला लिहीलेले पत्र वृत्त वाहिन्यांनी उचलून धरले. का? खालचा खिसा गरम केला की आमची प्रसारमाध्यमे अनैतिक गोष्टी कशा उचलून धरतात, ह्याचे उत्तम उदाहरण. ह्या पत्राचा नको तितका कारण नसताना गाजावाजा केला गेला. माफ करा ही कुस सुद्धा संत महात्म्यांना जन्म देणाऱ्या आईची नव्हती तर कदाचित रोहिणी हट्टंगडी सारख्या संस्कारक्षम आईची असावी जिच्या हातून कदाचित परिस्थिती मुळे मुलगा भ्रष्टाचारी मार्गाला लागला असावा. पत्राचाळीतील ६०० च्या वर घरमालकांचे शिव्याशापांचा धनी झाला असावा. वाममार्गाने पैसा कमविण्यासाठी बळी पडला असावा. ज्यावेळी तुम्ही शिव्याशापांचे धनी होता त्यावेळी त्याचे भोग तुमच्या प्रारब्धात निश्चित येतात. आणि संजय राऊत किती म्हणत असतील की मला फसविले गेले आहे, विरोधकांच्या राजकारणाचा मी बळी ठरलो. तर बा! राउता! हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा तू निडर शिवसैनिक आणि पत्राचाळचे जुने मालक ज्यांना तू बेघर केले ते तुझ्यावर आजही थुंकतात. त्यावेळी आईला विचारले होते का? बाळासाहेबांना विचारले होते का? नाही नं! तर मग बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगण्याचे औचित्य काय? जमानत मिळत नाही म्हणून न्यायालयीन व्यवस्थेला शिव्या कशापायी!
बा! राउता! ज्या कोर्टाने शिवसेनेचा दसरा मेळावा करण्यासाठी कायद्याने “शिवाजी पार्क” ऊद्धव गटाला दिला तेव्हा ऊद्धव गटाचा न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास आहे असे वक्तव्य केले. तेच संविधानाचे न्यायालय ज्यावेळी तुमची जमानत नाकारते तेव्हा तुम्ही कुठल्या तोंडाने म्हणता की “शत्रुच्या धमक्यांना घाबरलो नाही म्हणून तुरुंगात जावे लागले”! केल्या कर्माची फळे आहेत. भोगावी लागणार. मोदीवर बघा एकतरी असले लांछन आहे का!
राऊत भाऊ कशापायी बाळासाहेबांना आणि आपल्या आईला बदनाम करताय? तुम्ही भ्रष्टाचार केल्याचे पुरावे सापडले असे ईडी म्हणतेय तर न्यायालय ते मान्य करतेय. म्हणून तुम्ही गजाआड आहात. हां! तुम्हाला दसऱ्याचा मुहूर्त साधून जमानत मिळाली असती तर शिवाजी पार्क वर शिंदे भाजपाला शिव्यांची लाखोली वाहण्याचा मोठ्ठा चान्स हुकला म्हणून तुम्ही कोर्टात जमानत मिळाली नाही म्हणून खुप आक्रस्ताळेपणा केला आहे. कशासाठी! संविधानाने संजय राऊत नावाच्या भ्रष्टाचारी व्यक्तीला परत कोठडीमध्ये डांबले म्हणून हा आक्रस्ताळेपणा होता की शिवाजी पार्कवर उधम करण्याची संधी हुकली म्हणून हा आक्रस्ताळेपणा होता.
राऊत साहेब तुमच्या वागणुकीतून व्यक्त होते की तुम्हाला काय करायचे होते! पण ज्यावेळी राऊत सारख्या स्वार्थाने बजबजलेल्या शिवसैनिकाची ६०० लोकांना बेघर करण्याची पापं जेव्हा आभाळाहून मोठी होतात त्यावेळी त्यांचे लागलेले तळतळाट तुमचा एक एक गुन्हा जगासमोर उघड करतो. पापपूण्याच्या हिशेबात लोकांची हाय, शिव्याशाप हे जेव्हा वरचढ ठरतात. भ्रष्टाचाराचे माप जेव्हा आकाशाएवढे होते त्यावेळी मग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची शपथ घेतली जाते. मी सच्चा शिवसैनिक कसा हे सांगण्याची वेळ येते. ज्यावेळी सर्व मार्ग खुंटतात त्यावेळी आईची आठवण येते. तुम्ही गुंड प्रवृत्तीच्या नियतीने केलेला पत्राचाळ कारभार. भ्रष्टाचाराचे पुरावे, दाखले तुमच्यावर भारी पडले. सर्व रस्ते बंद झाल्यावर आईला आगतिक भावनेने साद घातली की “आई, मी नक्की परत येईन” आता आईतील संस्कारक्षम आई “बेटा! अपनी मां को खरीदने की कोशिश मत कर!” असे केव्हा म्हणते हे बघायचे!

भाई देवघरे

Leave a Reply