कार अपघातात आजीसह नातवाचा जागीच मृत्यू

बुलडाणा : १३ ऑक्टोबर – बुलडाण्यात अपघाताची एक भयंकर घटना घडली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कारला अचानक जनावरे आडवे आल्याने कार अनियंत्रित होऊन थेट पुलाच्या कठड्यावर धडकली. या दुर्देवी घटनेत एका ६ वर्षीय चिमुकल्यासह वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील गणेशपूर-मोहाडी रस्त्यावर पहाटे घडली. जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द येथील अवचार कुटुंबिय काही कामानिमित्त पहाटे चिखलीकडे कारने जात होते. दरम्यान, मोहाडी-गणेशपूर रस्त्यावर त्यांच्या वाहनाच्या समोर जनावर आडवे आल्याने भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला धडकली.
या भीषण अपघातात नंदा विठ्ठल अवचार (वय ६०), ऋषभ अंगत अवचार (वय ६) हे जागीच ठार झालेत. तर अंगत विठ्ठल अवचार (वय ३५), माधुरी अंगत अवचार (वय ३०), परी अंगत अवचार (वय २) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी पती-पत्नी असलेल्या अवचार दाम्पंत्याला खामगांव खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तर दोन वर्षीय चिमुकलीवर खामगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुर आहेत. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply