सम्पादकीय संवाद – देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सर्वच राज्यांनी पुढाकार घ्यावा

महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाला उत्तर देतांना फडणवीसांनी ही माहिती दिली आहे. असा कायदा महाराष्ट्रात लागू झाला तर ही निश्चितच स्वागतार्ह बाब ठरणार आहे.
फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये असा कायदा लागू करणे ही राज्यांची जबाबदारी असल्याचे नमूद केले आहे, त्यानुसार देशात देशात गोआ मंत्रिमंडळाने हा कायदा लागू केला आहे. लवकरच उत्तराखंड सरकारही हा कायदा लागू करणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातही यावर विचार होऊ शकतो. या कायद्यासंदर्भात अनेक गैरसमज पसरवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले, त्यामुळे हा कायदा लागू करण्याला समाजातील काही विशिष्ट घटकांकडून विरोध केला जातो.
समान नागरी कायदा ही तसा विचार करता देशाची गरज झाली आहे, हा कायदा फार पूर्वीच देशात लागू व्हायला हवा होता, मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारांनी देशातील काही अल्पसंख्यांक जमातींचे लांगुलचालन करण्यासाठी हा कायदा लागू केला नाही, परिणामी काही समाजांवर काही कायदे लादले गेले, तर काही समाजांना त्यातून सुटका मिळाली विशेषतः द्विभार्या प्रतिबंधक कायदा, कुटुंब नियोजन कायदा, महिलांना पैतृक संपत्तीत अधिकार देण्याचा कायदा, अश्या विविध कायद्यांपासून काही समाजांनी सुटका करून घेत आपला फायदा करून घेतला. परिणामी देशात काही अल्पसंख्यांक समाजाची लोकसंख्या गेल्या ७० वर्षात प्रचंड वाढली, परिणामी कुटुंब नियोजन कार्यक्रमाची ऐसीतैसी झाली, मात्र राज्यकर्त्यांना त्याचे सोयरसुतक नव्हते, ते मतपेटीच्या राजकारणातच मश्गुल होते. यामुळेच स्वातंत्र्य मिळाल्यावर ३५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताची लोकसंख्या आज १३८ कोटी इतकी झाली आहे. जर समान नागरी कायदा लागू केला नाही, तर देशाची लोकसंख्या अशीच गुणाकाराने वाढत जाईल.
हा एक मुद्दा झाला, असे अनेक मुद्दे सांगता येतील, त्यामुळे देशात काही समाजांमध्ये असंतोष वाढतो आहे, हा असाच वाढत राहिला तर उद्या अराजकाची स्थिती निर्माण होऊ शकेल. भारतीय जनता पक्षाने गेली अनेक वर्ष देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली आहे, आता देशात त्यांचेच सरकार आहार, त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन देशभरात सर्वच राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न करणे आता गरजेचे झाले आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply