समान नागरी कायदा लागू करावा लागेल – देवेंद्र फडणवीस

मुंबई : १२ ऑक्टोबर – देशातील आणि राज्यातील लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सक्ती करावी लागेल, तसेच ‘एक देश, एक समाज, एक कायदा’ अशी संकल्पना असलेला समान नागरी कायदा लागू करावा लागेल असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
अभिनेते नाना पाटेकर यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये नाना पाटेकरांनी या दोघांना विविध प्रश्नावर बोलतं केलं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर हे वक्तव्य केलं.
कुटुंब नियोजन कार्यक्रमावर आपण कधीच बोलणार नाही का? लोकसंख्या नियंत्रणात असेल तर आपल्याला फायदा होणार नाही का? यावर काय धोरण आहे असं नाना पाटेकर यांनी विचारलं. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “देशातील आणि राज्यातील लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती करावी लागेल. त्यासाठी कायद्याची गरज आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी एखादा कायदा आणावा लागेल. चीनच्या धरतीवर आपण काही सक्ती करु शकत नाही. पण भारतातही भारतीय पद्धतीने अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागेल.”
लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समान नागरी कायदा हा भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. ती प्रत्येक राज्याची जबाबदारी आहे. असा कायदा गोव्यामध्ये आहे, आता उत्तराखंडमध्ये येणार आहे. हळूहळू देशाच्या इतर भागातही तो कायदा लागू होईल. पण समान नागरी कायद्याच्या बाबतीत अफवा जास्त आहेत. त्यामुळे कुणाचे तरी आरक्षण जाईल, कुणावर तरी नियंत्रण येतील अशा प्रकारचा गैरसमज पसरवला जात आहे. पण असं काहीही होणार नाही. ‘एक देश, एक समाज, एक कायदा’ अशा प्रकारचा हा समान नागरी कायदा आहे. त्यामुळे तो गरजेचा आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकरांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की, पहिल्यांदा मी ज्यावेळी मुख्यमंत्री होतो त्यावेळी माझ्या भाषणाच्या आवाजाचा स्तर उंच होता. त्यावेळी प्रत्येक भाषणानंतर मला नानांचा फोन यायचा. तुझ्या आवाजाचा स्तर जरा खाली आण, तो फार उंच होतोय असा सल्ला ते द्यायचे. त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा मला खूप फायदा झाला. आज जो माझ्यात काही बदल झालेला आहे तो सर्व काही नानांच्या सल्ल्यामुळे असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply