समता पार्टीचा उद्धव गटाला देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावर दावा

मुंबई : १२ ऑक्टोबर – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये शिवसेनेवरील हक्कावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगळी नावं आणि निवडणूक चिन्हं दिली आहेत. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ ही नावं देण्यात आली आहेत. तसेच उद्धव यांच्या गटाला धगधगती मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार ही चिन्हं देण्यात आली आहेत. मात्र आता या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाला देण्यात आलेल्या चिन्हावर अन्य एका पक्षाने दावा केला असून थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
समता पार्टीने उद्धव गटाला देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावर दावा सांगितला आहे. १९९४ सालापासून हे राष्ट्रीयकृत चिन्ह आमच्या पक्षाचं असल्याचा दावा पक्षाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या तृणेश देवळेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. यासंदर्भात पक्षाने निवडणूक आयोगाला ईमेलच्या माध्यमातून माहिती कळवली असून हे चिन्ह आम्हाला देण्यात यावं अशी मागणी केली आहे. इतकच नाही तर या चिन्हासाठी थेट न्यायालयामध्ये जाण्याचा इशाराही समता पार्टीने दिला आहे.
“१९९४ पासून मशाल हे चिन्ह समता पार्टी या राष्ट्रीयकृत पक्षाला दिलेलं आहे. २०१४ पूर्वी आम्ही भारतामध्ये मशाल या चिन्हावरच निवडणुका लढवल्या आहेत. २०१४ पासून आम्ही कोणत्याही निवडणुका न लढवल्याने आमच्या पक्षाचं चिन्ह गोठवण्यात आलं होतं. आता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटला आम्ही वापरत असलेलं मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे,” असं देवळेकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडताना सांगितलं.
“चिन्ह गोठवलं असताना तुम्ही पुन्हा मागणी का केली आहे? यातून वाद निर्माण होईल असं नाही का वाटत?” असा प्रश्न देवळेकर यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना देवळेकर यांनी, “वाद होईल की नाही हा पुढचा प्रश्न झाला. आमची मागणी आहे की मशाल हे आमचं जुनं चिन्ह आम्हाला परत मिळावं. आपण पाहिलं तर आम्ही या चिन्हावर मागील २० वर्ष निवडणुका लढवल्या आहेत. आमचं मागील सात वर्षापासून कुठलंही अस्तित्व नसल्याने आमचं चिन्ह गोठवण्यात आलं आहे. आम्ही महाराष्ट्रासंदर्भात ही मागणी करत आहोत. यापुढे आम्ही सर्व निवडणुकींमध्ये उमेदवार देणार आहोत,” असं देवळेकर म्हणाले आहेत. तसेच २०२४ ला आम्ही निवडणुका लढवणार असल्याचं देवळेकर यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply