नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर आमदारपुत्राने घातला गोंधळ

नागपूर : ११ ऑक्टोबर – नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचण्याकरता बॅटरीवर चालणारी गाडी वेळेवर उपलब्ध करुन न दिल्यामुळे शहरातील एका आमदाराच्या पुत्राने महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन सोमवारी (10 ऑक्टोबर) रेल्वे स्थानकावर चांगलाच गोंधळ घातला. यासंदर्भात रेल्वेचे अधिकारी मात्र काहीच बोलायला तयार नाही.
आमदार पुत्राच्या धमकीमुळे महिला कर्मचारी चांगलीच धास्तावली असून काही महिन्यांपूर्वी बायपास सर्जरी झाली होती. तिला रुग्णालयात भरती करण्यात आले होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
नागपुरातील एका नेत्याच्या पुत्र सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास मध्यवर्ती रेल्वे स्थानकावरील उपस्टेशन प्रबंधक कार्यालय (वाणिज्य) येथे आला. प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या गाडीची मागणी त्याने कार्यालयात उपस्थित महिला कर्मचाऱ्याला केली. मात्र, गाडी एका व्यक्तीसाठी पूर्वीच गेल्याने मिळण्यास उशीर झाला असे तिने सांगितले. त्यामुळे नेता पुत्राचा पारा चढला. त्याने उपस्थित महिला कर्मचाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. आपण एका मोठ्या नेत्याचा पुत्र आहोत. तुम्ही मला ओळखत नाही का? असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच पाहून घेण्याची धमकी दिली.
यासंदर्भात वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी आपल्याकडे अजूनपर्यंत अशी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगितले. या प्रकरणाने इतरही कर्मचारी धास्तावले असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची चर्चा परिसरात होती. एरव्ही रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस गस्तीवर असतात. खाकीचा जोर दाखवतात. मात्र, एवढी मोठी घटना झाल्यानंतरही एकही सुरक्षा व्यवस्थेतील जवान मदतीसाठी धावला नाही. कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. काहीच झाले नाही असे दाखवत सर्वच सावरासारव करत आहेत.

Leave a Reply