धर्मांतर प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते राजेंद्र पाल गौतम यांची होणार पोलीस चौकशी

नवी दिल्लीः ११ ऑक्टोबर – आम आदमी पक्षाचे नेते राजेंद्र पाल गौतम यांची आता पोलिस चौकशी होणार आहे. कथित धर्मांतर प्रकरणात त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता पोलिस चौकशीला समोरं जावं लागत आहे.
दिल्ली सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्यावर हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी भाजपने त्यांच्या विरोधात आंदोलन केले होते. गौतम हे एका कथित धर्मांतर कार्यक्रमात सहभागी झाल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने गौतम यांच्यावर हल्लाबोल केला होता.
पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी राजेंद्र पाल गौतम यांच्यावर अरोप केला होता की, ऑक्टोबर 2025 पर्यंत 10 कोटी हिंदूंना बौद्ध अनुयायी बनवण्याचे लक्ष्य ‘आप’ने ठेवले आहे. त्यानंतर दिल्ली सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दोन दिवसांपूर्वीच दिला.
आता राजेंद्र पाल गौतम यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यांना धर्मांतर प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती सोबत ठेवण्यास सांगितलं आहे. यासंबंधी सोमवारी माध्यमांनी विचारलं असता, आपल्याला कोणत्याही चौकशीसाठी बोलावलं नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. परंतु पोलिसांकडून त्यांना बोलावल्याचं आज स्पष्ट झालेलं आहे.

Leave a Reply