…वार-पलटवार – विनोद देशमुख

‘राज’ की बात कह दूं तो…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी नागपुरात घेतलेल्या पत्रपरिषदेत तीन अतिशय महत्त्वाचे आणि विचारणीय मुद्दे मांडले. या परखडपणाबद्दल त्यांना दाद दिली पाहिजे.
एक- फाॅक्सकाॅन उद्योग महाराष्ट्रातून गेला, याला लाचखोरी कारणीभूत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आणि चौकशीची मागणी केली. संशयाचे बोट मामु उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांच्याकडे असल्याचे स्पष्ट जाणवत होते.
दोन- मुंबई महानगर पालिका वगळता इतर मनपा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत प्रभाग पद्धतीेऐवजी जुनी वार्ड पद्धतच लागू करावी, तसेच नगराध्यक्ष आणि सरपंच थेट निवडू नये, अशा मागण्या त्यांनी केल्या. या पद्धतीने गोंधळच होतो आणि लोकांची कामे होणार नाहीत, असा रास्त दावा त्यांनी केला.
तीन- वेगळा विदर्भ हवा की नको, याचा निर्णय संपूर्ण विदर्भात जनमताचा कौल घेऊन करावा.‌ त्यासाठी निवडणुकीसारखे मतदान घ्यावे, असे त्यांनी सुचवले.
या तीनही सूचनावजा मागण्या विचार करण्यासारख्या नाहीत का ? फाॅक्सकाॅन उद्योग फक्त चर्चेच्या स्तरावर असताना आणि कुठलाही करार झालेला नसताना, तो गुजरातने पळवून नेला म्हणणारे, चर्चा फिसकटण्याचे कारण सांगत नाहीत, हे संशयास्पद आहेच. शिवाय, वेदांताचा यासंदर्भातील खुलासाही संशय वाढविणारा आहे. वार्ड पद्धती आणि थेट निवडण्याऐवजी सदस्यांमधून बहुमताचा नगराध्यक्ष किंवा सरपंच हीच लोकशाहीची पद्धत ठीक आहे. अन्यथा नसता घोळच जास्त होतो. जनमताचा कौल घेऊन वेगळ्या विदर्भाचा सोक्षमोक्ष लावणे केव्हाही चांगले. कारण, कोणताही सत्ताधारी विदर्भ देण्याच्या मनस्थितीत आजतरी दिसत नाही. काॅंग्रेस आणि भाजपाने वर्षानुवर्षे तोंडाला पाने पुसली आहेत, राष्ट्रवादीची भूमिका गुळमुळीत आहे आणि शिवसेनेचे दोन्ही गट अखंड महाराष्ट्रवादी. विदर्भवाद्यांचे प्रभावी आंदोलन उभे राहण्याची शक्यता दिसत नाही.
मुंबईकर राज ठाकरे यांनी मांडलेले हे तीनही मुद्दे गंभीरपणे विचार करण्यासारखेच आहेत ना

विनोद देशमुख

Leave a Reply