देहव्यापारासाठी कोलकात्यातून अपहरण केलेल्या मुलीची केली सुटका

नागपूर : २० सप्टेंबर – देहव्यापारासाठी कोलकाता येथून अपहरण केलेल्या १४ वर्षीय मुलीची ब्रम्हपुरी शहरातून सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत ब्रम्हपुरी येथील मंजित रामचंद्र लोणारे (४०), चंदा मंजित लोणारे (३२) या दाम्पत्याला अटक केली.
नागपुरातील एका सामाजिक संस्थेने चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे बाहेरून आणलेल्या अल्पवयीन मुलीकडून ब्रह्मपुरी शहरात देहव्यापार करून घेतला जात असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी ब्रम्हपुरी येथील मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेट कॉलनी बंगला क्रमांक १४ येथे बनावट ग्राहक पाठवला. तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर या बनावट ग्राहकाने इशारा करताच बंगल्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी कोलकाता तेथे कोलकात्यातील एक अल्पवयीन मुलगी आढळून आली. कोलकात्यातून अपहरण करून तिला देहव्यापारासाठी येथे आणल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्या मुलीची सुटका केली.
याप्रकरणी मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेटमध्ये वास्तव्यास असलेल्या मंजित रामचंद्र लोणारे, चंदा मंजित लोणारे या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या मुलीला प्रथम नागपुरात विकले होते, त्यानंतर तिला ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply