तर भाजपाने सरनाईक कुटुंबाची माफी मागितली पाहिजे – सुप्रिया सुळे

मुंबई : १९ सप्टेंबर – अमित शाह खरं बोलतात. अनेकदा मला हा अनुभव आला आहे. मला नक्की खात्री आहे की ते मला एक महिला खासदार म्हणून न्याय देतील,” असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी पुण्यामध्ये हे विधान केलं. शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांच्याशीसंबंधित ‘टॉप्स समूह’ गैरव्यवहाराचा तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे विभागाचा अहवाल महानगर दंडाधिकाऱ्यांनी स्वीकारल्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलं आहे. इतकच नाही पुराव्यांआभावी तर तपास बंद करणार असाल तर भाजपाने सरनाईक कुटुंबाची माफी मागितली पाहिजे असंही सुप्रिया यांनी म्हटलं आहे.
काही नेत्यांना मागील काही दिवसांपासून सक्तवसुली संचलनालयाकडून क्लीनचीट देण्यात आल्या प्रकरणी प्रश्न विचारला असता सुप्रिया यांनी, “एकतर मग पहिला आरोप खोटा होता. असं असेल तर तुम्ही कुटुंबांची आणि महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. तुम्ही त्यांची बदनामी करताय म्हणून
जर त्यांनी ती चूक केली असेल तर तुम्ही क्लीन चीट कशी देताय? हा दोन्ही बाजूंनी भाजपाने विचार केला पाहिजे,” असं मत व्यक्त केलं. त्यानंतर पत्रकारांनी प्रताप सरनाईक यांचा उल्लेख करत सुप्रिया यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना सुप्रिया यांनी आपण हा प्रश्न संसदेमध्ये उपस्थित करणार असल्याचं सांगितलं
प्रताप सरनाईक यांना क्लीनचीट दिली आहे, असं म्हणत पत्रकारांनी सुप्रिया यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर सुप्रिया यांनी, ती कशी दिली मला माहिती नाही असं उत्तर दिलं. पुढे सुप्रिया यांनी, “अमितभाई शाहांवर माझा खूप विश्वास आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की एक महिला खासदार म्हणून अमित शाह मला नक्की न्याय देतील. अमित शाह खरं बोलतात. अनेकदा मला याचा अनुभव आलेला आहे. मी संसदेमध्ये हा विषय मांडणार आहे. माहितीच्या आधारे मी हा विषय मांडणार आहे,” असं पत्रकारांना सांगिलं.
मला सीबीआय वगैरेचा वापर कसा करतात याबद्दलचं जनरल नॉलेज नाही. आधी ईडीवगैरे काय होतं हे ही माहिती नव्हतं. आता ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले ते तसेच या साऱ्याची क्रोनोलॉजी बघा,” असं म्हणत सुप्रिया यांनी भाजपाला लक्ष्य केलं. “एक पत्र उद्धव ठाकरेंना पाठवण्यात आलं. ज्यात आपण भाजपासोबत जाऊ म्हणजे आपल्यावरचे सीबीआयचे आरोप रद्द होतील. त्यानंतर त्यांच्यावर आरोप झाले. त्यांच्या मालमत्तांवर छापे पडले.
त्यांचं कुटुंब कशातून गेलं याचा कोणी कधी विचार केला आहे? आज तुम्ही म्हणता आमच्यासमोर काही पुरवाचे नाहीत. मग आधी जे आरोप केले ते कशाच्या आधारावर केले?” असा प्रश्न सुप्रिया यांनी विचारला आहे.
आधी पुरावे नसताना आरोप आणि आता क्लीनचीट असा संदर्भ जोडत सुप्रिया यांनी, “भाजपाने सरनाईक कुटुंबाची हात जोडून माफी तरी मागावी. त्यांच्यावर झालेले आरोप पाहता महाराष्ट्राचीही माफी मागितली पाहिजे. इथे भ्रष्टाचार होतो अशापद्धतीचं महाराष्ट्राचं नाव देशामध्ये खराब केलेलं आहे.
त्यांची कुटुंब, मुलं, सुना कशातून गेल्या असतील याचा कधी विचार केला आहे का? अशी दोन उदाहरणं आहेत ज्यांच्यावर आरोप झाले आणि आता सरकारमध्ये गेल्यावर त्यांना क्लीनचीट मिळाली. आधी खोटे आरोप झाले, ब्लॅकमेलिंग केलं. मग त्यांच्या पक्षात गेल्यावर क्लीनचीट मिळाली,” असंही म्हटलं आहे.

Leave a Reply