भाजपाला दाखवण्यापुरते मित्र, आम्ही त्यांना फारसं महत्व देत नाही – मनसे

नागपूर : १८ सप्टेंबर – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि मनसेमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षामध्ये युतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गणेशोत्सव काळात देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपा आणि मनसेमध्ये युती होणार का? याबाबत मनसे नेते अविनाश जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “भाजपाला दाखवण्यापुरते मित्र आहेत. आम्ही त्यांना फारसं महत्व देत नाही”, अस विधान अविनाथ जाधव यांनी केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान जाधव यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आम्ही अजून कुठेही आमची युती होतेय, असं म्हटलेलं नाही. त्यामुळे आमची भूमिका ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असली पाहिजे. आम्ही सगळ्या जागांवर लढणार आहोत. आमचे सगळ्या पक्षात मित्र आहेत, असं अविनाश जाधव म्हणाले.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी पक्षबांधणी तसेच निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. सर्वपक्षीय नेते आपापले पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी बातचीत करत करत असून या निवडणुकांसाठी योजना आखत आहेत. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील कंबर कसली आहे. सध्या ते विदर्भ दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यात ते नागपूर, चंद्रपूर, अमरावतीतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन सविस्तर चर्चा करतील. आजपासून (१८ सप्टेंबर) त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून सध्या ते नागपूरमध्ये आहेत. २२ तारखेला ते दौरा आटपून मुंबईत परतणार आहेत.

Leave a Reply