नागपूरला येताच राज ठाकरेंनी पुरवला चिमुकल्याचा हट्ट

नागपूर : १८ सप्टेंबर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पाच दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा या दौऱ्याची सुरुवात आज नागपुरातून होतेय. या दौऱ्याच्या सुरुवातीलाच एक भन्नाट प्रसंग समोर आला आहे. राज ठाकरे यांचा आणि त्यांच्या वक्तृत्व शैलीचं सामान्यामध्ये आकर्षण असतं असं नेहमी बोललं जातं. मात्र राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव चिमुकल्यावरही आहे. याची एक प्रचिती आणणारा एक प्रसंग आज नागपुरात घडला. अद्वैत पत्की नावाचा अवघ्या दहा वर्षाचा एक मुलगा मला राज ठाकरे यांना भेटायचे आहे, असा हट्ट करून आपल्या आजीला घेऊन हॉटेल समोर सकाळपासून थांबला होता.
राज ठाकरे जेव्हा साडेनऊच्या सुमारास हॉटेलमध्ये दाखल झाले, तेव्हा नागपुरातील काही कार्यकर्त्यांना हा चिमुकला कोपऱ्यात उभा दिसला. त्याला रवी भवन या ठिकाणी जाऊन राज ठाकरे यांची दुपारी भेट घे असा सल्ला देण्यात आला. मात्र चिमुकला आणि त्याची आजी तिथून हटायला तयार झाले नाही. अखेरीस त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला. ‘दहा वर्षांचा एक मुलगा आपल्याला भेटू इच्छितो, तो सकाळपासून उपाशी उभा आहे’ असा निरोप कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना दिला. त्यानंतर वरच्या माळ्यावर थांबलेल्या राज ठाकरेकडून तळ मजल्यावर थांबलेल्या चिमुकल्याकडे निरोप आला. ‘तू आधी नाश्ता कर, काहीतरी खा. त्याच्यानंतरच मी तुला भेटणार आणि माझे ऑटोग्राफ देणार’, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या निर्देशाप्रमाणे चिमुकल्याने नाष्टा केला आणि त्यानंतर अकरा वाजून पाच मिनिटाला जेव्हा राज ठाकरे हॉटेलमधून रवी भवनला जाण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा सर्वात पहिले त्यांनी लिफ्ट मधून बाहेर पडल्यावर अद्वैची भेट घेतली. त्याने सोबत आणलेल्या डायरीवर त्याला ऑटोग्राफ दिला आणि शुभेच्छा देत राज ठाकरे रवीभवनला निघाले. मला राज ठाकरे यांची भाषण आवडतात असं म्हणणारा देणारा अद्वैत हा राज ठाकरे यांचा ऑटोग्राफ घेऊन समाधानी होऊन घरी परतला.

Leave a Reply