गोंदियात २ शिक्षकांनी सहावीतल्या आदिवासी मुलाला बेशुद्ध होत पर्यंत केली मारहाण

गोंदिया : १५ सप्टेंबर – गोंदियामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात शारीरिक सरावादरम्यान दोन शिक्षकांनी एका आदिवासी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला दोन शिक्षकांने बेशुद्ध होईपर्यंत जबर मारहाण केल्याचा संपाजनक प्रकार समोर आला आहे. गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या प्रकरणी पालकांनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आणि पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रकरणात चौकशी समितीही गठीत करण्यात आली. यानंतर एका शिक्षकाला निलंबित करण्यात आलं तर दुसऱ्याने माफिनामा लिहून दिला आहे. पालकांनी गोंदिया ग्रामीण पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तेजेश्वर तुरकर आणि लालचंद पारधी या दोन्ही शिक्षकांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. दोन्ही शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.
प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल शाळेत 30 ऑगस्टला शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षकाने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. हा विद्यार्थी मुरपारचा रहिवासी आहे. मुलगा बेशुद्ध पडल्याचं शाळेनं कळविल्यानंतर पालकांनी शाळेत धाव घेतली आणि मुलाला रुग्णालयात दाखल केलं. औषधोपचारानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने शिक्षकाने मारहाण केल्याचा खुलासा केला.
मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे पालकांनी शिक्षकासह शाळा व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आदिवासी प्रकल्प अधिकारी देवरी यांच्याकडे तक्रारीतून केली. याप्रकरणी आता दोषी शिक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. मात्र, या घटनेमुळे धास्तावलेले विद्यार्थी आता शाळेत जाण्यास नकार देत असल्याचं पालकांनी म्हटलं आहे.

Leave a Reply