अनिल देशमुखांविरोधात खटला चालवण्यास सीबीआयला राज्य सरकारची संमती

मुंबई : १४ सप्टेंबर – 100 कोटी वसुली प्रकरणामुळे कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनिल देशमुख विरोधात खटला चालवण्यास CBI ला राज्य सरकारनं संमती दिली आहे. आता याचा अंतिम निर्णय हा राज्यपाल घेणार आहे.
राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशीला संमती दिली आहे. एखादा शासकीय अधिकारी किंवा माजी मंत्री भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आरोपी असेल तर खटला चालवण्यास राज्य सरकारची अनुमती लागते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. अनिल देशमुख आणि इतर आरोपींच्या विरोधात CBI ने याआधीच दोषारोपपत्र दाखल केलंय.
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे स्वीय सहायक संजीव पलांडेच्या जामीन अर्जावर CBI ने उत्तर सादर केलं आहे. सचिन वाझे अनिल देशमुखांना नंबर 1 म्हणायचा तर परमबीर सिंगला राजा असं म्हणायचा, अशी माहिती सीबीआयने उत्तरात दिली आहे. संजीव पलांडे यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. मुंबईतल्या बार मालकाकडून नंबर 1 च्या नावाखाली पैसे वसूल करत होता असा सचिन वाझेचा जबाब आहे. या प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाला आहे.

Leave a Reply