शिवसेना ही खरी शिवसेना राहिली नाही – चंद्रशेखर बावनकुळे

नंदुरबार : १३ सप्टेंबर – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या या राजकीय दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या दौऱ्याविषयी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या बुथ प्रमुखांची बैठकही यावेळी घेण्यात येणार असून नंदुरबार तैलिक महासभेतर्फे बावनकुळे यांचा जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. चंद्रशेखर बावनकुळे नंदुरबार दौऱ्यावर असतानाच त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यशैलीवर टीका केली आहे. मागचे सरकार हे तीनचाकी रिक्षा सारखे होते तर सध्याचे सरकार हे बुलेट ट्रेनसारखे असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करताना त्यांनी सांगितले की, शिवसेना ही खरी शिवसेना राहिली नाही अशी टीका करत शिवसेनेत हिंदुत्त्व राहिले नसल्याचा घणाघातही त्यांनी केला.
शिंदे सरकारमुळे अजित पवार आणि विरोधी पक्षनेते बावचळले असल्याचे सांगत त्यांना या सरकारवर टीका करण्याचा अधिकार नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. शिंदे गटावर जी टीका केली जात असते ती टीका फक्त प्रसिद्धीसाठी असते असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
ज्या पद्धतीने रात्रीतून सरकार गेले तसेच काही विरोधी गटातील बडे नेते आश्यर्यकारकरित्या भाजपामध्ये दिसतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
याकूब मेमन कबर सुशोभीकरण हे उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात झाले आहे, आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना हा विषय त्यांच्या यंत्रणांनी सांगितला नसेल का फक्त मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी ही त्यांचा समझोता का ? उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
बारामतीत बदल नक्कीच होणार उत्तर प्रदेशातील अमेठी बदल होऊ शकतो तर बारामती का नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना बारामतीसाठी प्रभारी म्हणून नेमले आहे आणि त्यात बदल होऊन महाराष्ट्रातील 45 खासदार निवडून येतील असा विश्वासही भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply