वर्धेत पुराच्या पाण्यात वाहून जाणारे मामा-भाचे थोडक्यात बचावले

वर्धा : १२ सप्टेंबर – राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचं थैमान बघायला मिळत आहे. वर्धा जिल्ह्यातही बहुतांश भागाला रविवारी संध्याकाळी जोरदार पावसानं झोडपलं आहे. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलेला आहे. याच मुसळधार पावसामुळे कारंजा (घाडगे) तालुक्यातील खडक नदीला आलेल्या पुरातून वाट काढताना मामा भाचा दुचाकीसह पाण्यात पडल्याची घटना समोर आली आहे.
नदीला आलेल्या पुरातून वाट काढताना ते पाण्यात पडले. यानंतर पाण्याच्या प्रवाहासोबत दोघंही वाहून जाऊ लागले. मात्र, सुदैवाने एका झाडामुळे त्यांचा जीव वाचला. हे दोन्ही मामा-भाचे वाहून जात असताना मध्ये आलेल्या झाडाला पकडून वरती चढल्याने दोघंही थोडक्यात बचावले. दोघांनाही महसूल विभाग, पोलीस आणि नागरिकांच्या मदतीनं काही तासांच्या प्रयत्नांनंतर सुरक्षित रेस्क्यू केलं गेलं.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातल्याने यात अनेक दुर्घटना घडल्याचं समोर येत आहे. कारंजा तालुक्यातही वीज पडून दोन घटनांमध्ये दोन ठिकाणी जनावरे दगावली आहेत.
दरम्यान, राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस मान्सून सक्रिय राहणार असून काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान 12 सप्टेंबरपासून निर्देशानुसार मुंबई, ठाण्यासह कोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. घाट भागातही मुसळधार पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply