राम मंदिराच्या बांधकामाला येणार १८०० कोटींचा खर्च

नवी दिल्ली : १२ सप्टेंबर – अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात गाजलेल्या अयोध्येतील बाबरी मशिद रामजन्मभूमी वादावर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं, तर मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा देण्यात यावी, असं न्यायालयानं आपल्या निकाल पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर राम मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू झालं आहे. त्यात आता राम मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे १,८०० कोटी रुपयांचा खर्च येईल, अशी माहिती समोर आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या रामजन्मभूमी ट्रस्टची बैठक अयोध्या येथे पार पडली. या बैठकीत आतापर्यंत मंदिराचं झालेले निर्माण, खर्च यावरती चर्चा करण्यात आली. तसेच, तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार राम मंदिर उभारणीसाठी १,८०० कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज रामजन्मभूमी निर्माण ट्रस्टचे विश्वस्त चंपत राय यांनी व्यक्त केला.
त्याचसोबत राम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषादराज, शबरी आणि जटायू यांची मंदिरेही बांधण्यात येणार आहे. तर, मंदिराचे सर्व दरवाजे सागवान लाकडापासून बनवले जातील, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, यापूर्वी राम मंदिर निर्माणासाठी ११०० कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज व्यक्त केला होता. “राम मंदिर तीन ते साडेतीन वर्षांत बांधले जाईल. त्यासाठी ३०० ते ४०० कोटी रुपयांचा खर्च येईल. तर, संपूर्ण ७० एकर परिसराच्या निर्माणासाठी ११०० कोटींपेक्षा अधिक खर्च येणार आहे,” अशी माहिती रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंद गिरी महाराज यांनी दिली होती.

Leave a Reply