गुजरातमध्ये आपला मिळत असलेला पाठिंबा पाहून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे – अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : १२ सप्टेंबर – गुजरातमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी सर्व पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. दिल्ली, पंजाबनंतर गुजरातमध्ये सत्तेत येण्यासाठी आपने प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. त्यात आता गुजरातमधील आपच्या कार्यालयावर पोलिसांनी छापेमारी केली आहे. यावर आपल्याला मिळत असलेला पाठिंबा पाहून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा टोला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लगावला आहे.
रविवारी गुजरात पोलिसांनी अहमदाबाद येथील आपच्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. याबाबत आपचे नेते इसुदान गढवी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. “अरविंद केजरीवाल यांच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांनी आपच्या कार्यालयावर छापा टाकत दोन तास झाडाझडती केली. तसेच, आम्ही पुन्हा येऊ,” असेही पोलिसांनी म्हटल्याचं गढवी यांनी सांगितलं आहे.
यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “गुजरातमध्ये आपला नागरिकांकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. हे पाहून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दिल्लीनंतर गुजरातमध्येही छापेमारी सुरू झाली आहे. दिल्लीत काही सापडलं नाही, गुजरातमध्येही काही मिळालं नाही. आम्ही प्रामाणिक देशभक्त लोक आहोत.”
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरामधील नागरिकांसाठी काही घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये वीज मोफत देण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. “आम्ही सर्व घरगुती ग्राहकांना 300 युनिट मोफत वीज देऊ. आम्ही सर्व शहरे आणि गावांमध्ये 24X7 वीज पुरवठा सुनिश्चित करू. जर त्यांच्या पक्षाला सत्तेत येण्याची संधी मिळाली तर 31 डिसेंबर 2021 पर्यंतची सर्व जुनी वीज बिले माफ केली जातील. गुजरातमध्ये दोन महिन्यांचे वीज बिल येते. दरमहा 300 युनिटनुसार, 600 युनिट दोन महिन्यांच्या बिलात मोफत उपलब्ध होईल,” असे केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply