भारत सर्व लोकशाहींची माता असल्याचा अभिमान – पियुष गोयल

नवी दिल्ली : ११ सप्टेंबर – भारतात कायद्याचे राज्य आहे. सुदृढ माध्यमे, पारदर्शक सरकारी यंत्रणा असल्याचा आम्हाला अभिमान आहे. २०४७ मधील अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे जागतिक विकासाला चालना देणारे पॉवरहाऊस म्हणून पाहिले जाऊ शकते. भारत सर्व लोकशाहींची माता असल्याचा अभिमान असल्याची भावना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेत व्यक्त केली आहे. गोयल सध्या सहा दिवसीय सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजेलिस दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क बैठकीत त्यांनी सहभाग घेतला होता.
गेल्या काही वर्षांत झालेल्या मूलभूत बदल आणि संरचनात्मक परिवर्तनाच्या परिणामांचे मूल्यांकन करताना, भारतीय उद्योग महासंघाने अंदाज व्यक्त केला आहे, की २०४७ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ३५-४५ ट्रिलियन डॉलर्सची असेल. देश विकसित राष्ट्रांच्या लीगमध्ये आहे, असेही गोयल म्हणाले. आम्ही भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. पुढील २५ वर्षांत भारताला नेमके कोणत्या स्थानावर पहायचं आहे याचा विचार करण्याची ही महत्वाची वेळ असल्याचे गोयल म्हणाले.
“भारतात गुंतवणुकीची ही सुवर्ण वेळ आहे. त्यामुळे तुम्ही भारतात गुंतवणुक करा, असं आवाहन गोयल यांनी अमेरिकेतील व्यापाऱ्यांना केलं आहे. तसेच भारतातील उत्पादने, हातमाग, हस्तकला, खादी प्रक्लपांना भेट देण्याचे आमंत्रणही गोयल यांनी अमेरिकेतील व्यापाऱ्यांना दिलं आहे. तसेच उच्च पातळीवरील डेटाची गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी भारत आधुनिक आणि समकालीन कायद्यांच्या संकल्पनेवर काम करत आहे. या कायद्यांची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, असेही गोयल म्हणाले.

Leave a Reply