जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आदिवासी तरुण ६ दिवसांपासून नागपुरात उपोषणावर

नागपूर : ११ सप्टेंबर – उच्च शिक्षणासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळावे या मागणीकरिता 19 वर्षीय आदिवासी समाजाची तरुणी नागपूरच्या संविधान चौकात गेल्या सहा दिवसांपासून उपोषणावर बसली आहे. तन्नू सूरदास जांभूळे असे या तरुणीचे नाव आहे.
तन्नूच्या चुलत बहिणीला आदिवासी विभागाने जात वैधता प्रमाणपत्र दिले. त्याआधारे तन्नूने प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मात्र, जात पडताळणी समितीने तन्नूला जात पडताळणी प्रमाणपत्र नाकारले आहे. त्यामुळे ती संविधान चौकात उपोषणावर बसली आहे. तन्नू जांभूळेकडून यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक रिट याचिकाही दाखल केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे राहणाऱ्या तन्नू जांभुळे या विद्यार्थिनीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आजवर घवघवीत यश मिळवले आहे. दहावीची परीक्षा असताना तन्नूने तिचे वडील गमावले. तेव्हापासूनचं तिची आई शेळीपालक म्हणून काम करते आहे. तिची आई कुटुंबाची एकमेव कमावती आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत तन्नूने दहावीच्या परीक्षेत ८८ टक्के गुण मिळवले होते. बारावीतसुद्धा तिला चांगले यश मिळाले. तिने नीटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तन्नूला डॉक्टर व्हायचे आहे. परंतु आदिवासी विभागाने तिला जात वैधता प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने अडथळ्याचा सामना करावा लागतो आहे.

Leave a Reply