…वार-पलटवार – विनोद देशमुख

अफझलखान, औरंगजेब अन् आता याकुब मेमन

भारत हा देश म्हणजे धर्मशाळा आहे, असं कोणीतरी म्हटलं, ते खोटं नाही. आओ जाओ घर तुम्हारा, खाओ पिओ माल हमारा…!! पाऊणशे वर्षे झाली, तरी शेजारच्या देशांमधून होणारी घुसखोरी काही थांबत नाही. असे लाखो बांगलादेशी भारतात राहत आहेत, हा त्याचा सबळ पुरावा.
ज्यांनी बाहेरून येऊन आपल्यावर राज्य केलं अशा स्वराज्याच्या शत्रूंबद्दलही आपण उगाचच ‘उदारपणा’ दाखवतो ! छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वहस्ते मारलेल्या अफझलखानाची मजार प्रतापगडाच्या पायथ्याशी हायपाय पसरत आहे.‌ छत्रपती संभाजी महाराजांना छळणाऱ्या औरंगजेबाची कबर औरंगाबाद (खुलदाबाद) येथे शानसे उभी आहे. मुंबईकरांवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या याकुब मेमनचेही असे स्मारक उद्या मुंबईच्या बडा कबरस्तानात उभे राहिले तर आश्चर्य वाटायला नको. कारण, याकुबच्या कबरीचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे.
याकुब हा आरोपसिद्ध दहशतवादी होता. त्याचं उदात्तीकरण करणं हा सरळसरळ देशद्रोह आहे. त्यामुळे या प्रयत्नाच्या मुळापर्यंत जाण्याची आणि संबंधितांना हुडकून त्यांना शिक्षा करण्याची गरज आहे. हा प्रश्न धार्मिक नसून, पूर्णत: देशाशी संबंधित आहे. तो अतिशय कठोरपणेच हाताळला गेला पाहिजे.
आजी-माजी सरकारांमध्ये यावरून राजकारण सुरू झालं आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. प्रश्न असा आहे की, याकुबची कबर बनूच कशी दिली ? अमेरिकेनं ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर समुद्रात फेकून दिलं. आपणही अफझल गुरू आणि अजमल कसाब या दहशतवाद्यांचं दफन अज्ञात जागी केलं. तंच याकुबचं करणं अपेक्षित होतं. म्हणजे आजची भानगड उपस्थितच झाली नसती. न्यायालयीन निर्णयामुळे तसं झालं असेल तर मग, आपली न्यायालयं खरोखरच आंधळी झाली म्हणायची ! तसं नसेल तर तत्कालीन सरकारनं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. निदान, या प्रकरणातून भविष्यासाठी धडा घेणं आवश्यक आहे. नाहीतर या देशात दहशतवाद्यांचे देव व्हायला वेळ लागणार नाही

विनोद देशमुख

Leave a Reply