गणपती विसर्जन करायला गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू

यवतमाळ : १० सप्टेंबर – दिग्रस तालुक्यातील महागाव येथे गणपती विसर्जन करायला गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. गोकुळ दत्ता टेटर (१७) आणि सोपान बबनराव गावंडे (१७), दोघेही रा. महागाव, अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी हे दोघे आपल्या मित्रांसह नाल्यावर गेले होते.
गणपती विसर्जन करून ते घरी परतले. त्यानंतर गणपती मूर्ती पाण्यात बुडाली की नाही हे पाहण्यासाठी दोघेही परत नाल्यावर गेले. मूर्ती बुडाली नसल्याने नाल्यात उतरून त्यांनी मूर्ती खोल पाण्यात नेली. पाण्याचा अंदाज न आल्याने मूर्तीसह दोघेही बुडाले.
उपस्थित नागरिकांनी दोन्ही मुलांना तत्काळ बाहेर काढून आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी २० मिनिटे त्यांना बघितलेच नाही, ऑक्सीजन लावले नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या हलर्जीपणामुळेच मुलांचे जीव गेल्याचा गंभीर आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे आर्णी ग्रामीण रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण होते. आर्णी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply