याकूब मेमनचा मृतदेह परिवाराच्या स्वाधीन करणे ही भाजप सरकारची चूक – अतुल लोंढे

नागपूर : ८ सप्टेंबर – कुख्यात दहशनवादी याकूब मेमनला फाशी झाल्या नतर त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याची ही भाजप सरकारची चूक होती, नव्हे ती चूक त्यांनी मुद्दामहून केली होती, अशी टिका कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज केली..
यासंदर्भात बोलताना लोंढे म्हणाले, सर्वात पहिली चूक भारतीय जनता पक्षाने केली आणि ही चूक त्यांनी मुद्दामहून केली. कारण भाजपला या देशात धार्मिक शांतता नांदू द्यायचीच नाहीये. युपीए सरकारच्या काळात दोन कुख्यात आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा दिली गेली होती. त्यातील एक होता अफजल गुरू आणि दुसरा अजमल कसाब. त्यांचे शव त्यांच्या कुटुंबीयांना दिले गेले नव्हते. ते शव एका विशिष्ट ठिकाणी गाडल्या गेले होते.
अमेरिकेच्या कमांडोंनी जेव्हा ओसामा बीन लादेनला मारले होते, तेव्हा त्याचे शव समुद्राच्या आत गाडण्यात आले होते. जेणेकरून त्यांची मजार बांधली जाऊ नये आणि भविष्यात त्यावर कुणी राजकारण करू नये. पण याकूब मेननला जेव्हा फाशीची शिक्षा दिली गेली, तेव्हा त्याचे शव त्याच्या कुटुंबीयांना दिले गेले. त्याच्या अंत्ययात्रेमध्ये मोठ्या संख्येने लोक आले होते. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. भाजपने तेव्हा या सर्व परवानग्या दिल्या होत्या. त्यामध्ये त्यांचा राजकीय फायदा होता. त्यामुळे आता भाजपने या गोष्टीचे उत्तर दिले पाहिजे, असेही अतुल लोंढे म्हणाले.
या देशाला धर्मांध बनविण्याचे पाप भाजप करीत आहे. आता याकूब मेननच्या मजारचा राजकीय फायदा घेतला जात असेल तर याची सर्वस्वी जबाबदारी भाजपची आहे. ही बाब भाजप नेत्यांना कळत नाही, असे नाही. पण ते नेहमी आपला राजकीय फायदा बघतात, असा घणाघाती आरोप अतुल लोंढे यांनी केला. याकूब मेनन सारख्या कुख्यात आतंकवाद्यांचे शव त्यांच्या कुटुंबीयांना देऊ नये, असे धोरण केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून तयार करायला हवे, असेही लोंढे म्हणाले.

Leave a Reply