मुंबई दौऱ्यात अमित शाह यांच्या सुरक्षेत मोठी चूक, एक संशयित ताब्यात

नवी दिल्ली : ८ सप्टेंबर – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना एक अज्ञात व्यक्ती सुरक्षा भेदत त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी अमित शाह आणि इतर राजकीय नेत्यांच्या भोवती वावरत होती. वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील खासदाराचा पीए असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे.
हेमंत पवार असं या ३२ वर्षीय व्यावसायिकाचं नाव असून, त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत पवार मूळचा धुळ्याचा असून एका खासदाराचा पीए असल्याचा दावा करत आहे. त्याला मंत्र्यांची भेट घेत त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा होती. प्रसिद्धी किंवा फायद्यासाठी हे फोटो तो वापरणार होता असा संशय आहे.
सोमवारी अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी हेमंत पवार राजकीय नेत्यांच्या अवती भोवती वावरत असल्याने मंत्रालयाती एका अधिकाऱ्याला संशय आला. अधिकाऱ्याने ओळख पटत नसल्याने हेमंत पवारकडे विचारणा केली असता, त्याने आपण आंध्र प्रदेशातील खासदाराचे पीए असल्याचं सांगितलं.
मंत्रालयातील अधिकाऱ्याला संशय आल्याने त्याने पोलिसांना याबाबत सांगितलं. कार्यक्रम संपल्यानंतर तीन तासात पोलिसांनी त्याचा शोध घेत, बेड्या ठोकल्या. त्याला कोर्टात हजर केलं असता १२ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत पवार पांढरा शर्ट आणि निळं ब्लेझर घालून होता. त्याच्याकडे खासदारांच्या पीएसाठी असणारा पासही उपलब्ध होता. केंद्रीय गृहमंत्रालयाचा उल्लेख असणाऱ्या रिबिनला त्याने हा पास जोडला होता. याप्रकरणी चौकशी सुरु आहे.

Leave a Reply