अशी झाली भेटीची ‘पूर्ती’

शनिवारची दुपार. बेसा रोडवरील पूर्ती बाजार मध्ये थोडीफार खरेदी करून मी काउंटरजवळ जात असतानाच कर्मचाऱ्यांची धावपळ वाढली आणि पाहतो तर काय, प्रत्यक्ष पूर्तीचे कर्तेधर्ते नितीनजी गडकरीच आपल्या लवाजम्यासह आत येताहेत ! मला पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त करेस्तोवर मीच उत्तरलो- “गिऱ्हाईक आहे तुमचा !” त्यावर नेहमीचं दिलखुलास हास्य अन् मग पूर्ती भांडाराच्या सर्व काॅरिडोरमधून फेरफटका. सोबत पूर्ती बाजारचे अध्यक्ष रवीजी बोरटकर, माधव लाभे आदी. तपासणीच्या नजरेतून प्रत्येक गोष्टीची नितीनजींकडून बारीकसारीक चौकशी, सूचना… केंद्र सरकारमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात व्यस्त मंत्र्याचं हे दुसरं रूप !
नंतर एक छोटीशी बैठक. काय केल्यानं खप आणि गुणवत्ता वाढेल, वगैरेसंबंधी सहकाऱ्यांशी विचारविमर्श. बोरटकर यांच्यासह प्रमुख अधिकारी उत्तरं देत आहेत, प्रश्न विचारत आहेत, सल्ला घेत आहेत… असं ते एकूण दृश्य. बाहेर पडताना ‘पूर्तीजनां’ची आणि ग्राहकांची फोटोसाठी एकच गर्दी. प्रत्येकाला संधी देऊन हा धावता दौरा समाप्त.
खरं म्हणजे मी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन मग पूर्ती मध्ये आलो होतो. तो हुकलेला भेटीचा योग काही मिनिटांनीच असा आला ! बेलतरोडीतील एका कार्यक्रमासाठी आले असताना पूर्तीची वास्तपुस्त कराविशी त्यांना वाटली म्हणून माझं ‘जमलं’. हे आहेत नितीन गडकरी ! कामाचा अवाढव्य पसारा, तरीही चौफेर लक्ष. म्हणूनच आमजनता त्यांना चाहते, मानते आणि सॅल्यूट करते !
नंतर चिजवस्तू घेऊन बाहेर पडताना माझ्या ओठांवर आपसूकच पंडित कुमार गंधर्वांचं प्रसिद्ध गाणं होतं…
आज अचानक गाठ पडे….

Leave a Reply