शिवसेना कुणाकडे हा तांत्रिक भाग, ठाकरे कुणाकडे याला जास्त महत्त्व – जयंत पाटील

मुंबई : ७ सप्टेंबर – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील प्रकरणाची पुढील सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिलीय. “शिवसेना कुणाकडे हा तांत्रिक भाग आहे. ठाकरे कुणाकडे याला जास्त महत्त्व आहे,” असं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलं. तसेच उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा चालवत आहेत, असंही नमूद केलं.
जयंत पाटील म्हणाले, “घटनापीठ कालच (६ सप्टेंबर) स्थापन झालं आहे. त्याप्रमाणे त्यांनी या प्रकरणाची पुढील तारीख २७ सप्टेंबर दिली असेल. त्यावेळी काय होतं बघू. शेवटी न्यायालयाचेही प्राधान्यक्रम असू शकतात. काल घटनापीठ स्थापन झालं आहे आणि आज लगेच बसलं पाहिजे अशी अपेक्षा करणंही योग्य नाही. त्यांना त्यांचा वेळ दिला पाहिजे. मात्र, २७ सप्टेंबरला पुन्हा दोन महिन्यांची तारीख आली तर तो वेळकाढूपणा होईल. मात्र, मला खात्री आहे न्यायालय तसं करणार नाही.”
शिवसेना कुणाकडे हा तांत्रिक भाग आहे. ठाकरे कुणाकडे याला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा चालवत आहेत. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक उद्धव ठाकरेंनाच प्राधान्य देतील. एखाद्याच्या हातात सगळंच असेल तर त्याचा वापर कसा करायचा हे तेच ठरवत असतात. मात्र, न्यायालय त्याबाबत योग्य निर्णय करेल याची मला खात्री आहे.

Leave a Reply