राहुल गांधी व भारत जोडो यात्रेवर टीका करणारे भाजपाचे नेते आणि प्रवक्त्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई : ७ सप्टेंबर – काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेवर टीका करणाऱ्या भाजपाला शिवसेनेनं लक्ष्य केलं आहे. अशा गोष्टींकडे राजकीय मतभेद दूर ठेवून पहायला हवे असं सांगतानाच शिवसेनेनं अगदी अडवाणींच्या रथयात्रेपासून ते आदित्य ठाकरेंच्या ‘निष्ठा यात्रे’पर्यंत अनेक संदर्भ दिले आहेत. राहुल गांधींवर आणि या यात्रेवर टीका करणारे भाजपाचे नेते आणि प्रवक्त्यांवर शिवसेनेनं हल्लाबोल केला आहे. देशातील प्रश्नांवर बोलणारा एकही आज सध्या नाही. वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक पक्ष आवाज उठवत असताना देशातील सर्वात जुना पक्ष राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करत असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.
“काँग्रेस पक्षाने ‘भारत जोडो’ यात्रेची घोषणा करताच भारतीय जनता पक्षाचे नेते व प्रवक्ते टीका करू लागले. याचा सरळ अर्थ असा की, भाजपाला आजही काँग्रेसचे भय वाटते. तसे नसते तर हताश, निराश व कमजोर झालेल्या काँग्रेस यात्रेची दखल घेण्याची गरज नव्हती. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून कन्याकुमारीवरून ही यात्रा सुरू होईल. तीन हजार ५७० किलोमीटर असा राष्ट्रप्रवास करून यात्रेची समाप्ती कश्मीर येथे केली जाईल. यात्रेचा संदेश जनतेच्या मनास साद घालणारा आहे. ‘मिले कदम जुडे वतन’ असे यात्रेचे घोषवाक्य आहे. यावर टीका करावी, खिल्ली उडवावी असे काय आहे? पण भाजपा प्रवक्त्यांनी सांगितले, भारत जोडोपेक्षा काँग्रेस जोडो यात्रा अधिक समर्पक ठरेल. कारण सर्वत्र काँग्रेसचे तुकडे पडत आहेत. आधी काँग्रेस वाचवा, मग देश जोडायचे बघा. ही यात्रा बहीण-भावांची आहे. दुसरे कोणी त्यात सामील होणार नाही.’ गांधी परिवारास वाचविण्यासाठी ही यात्रा असल्याचाही सूर भाजपाने लावला आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
भाजपाचे हे सर्व गमतीचे आहे. काँग्रेस पुन्हा उठली तर भाजपासमोर अडचणी निर्माण होतील. राहुल गांधी, प्रियंका गांधी हे जनसमर्थन मिळविण्यात यशस्वी झाले तर? या भयातून ‘भारत जोडो’ वर व्यक्तिगत टीका सुरू आहे. देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला तरी हे शोभा देत नाही. काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने राष्ट्रीय ऐक्यासंदर्भात एखादा कार्यक्रम ठरवला असेल तर त्यास कोणी अपशकून करू नये. असे कार्यक्रम सध्या राष्ट्रीय ऐक्यासाठी हवेच आहेत. जर परराष्ट्रांतील ट्रम्प वगैरे लोकांसाठी आपल्या देशात निवडणूक प्रचाराचे कार्यक्रम होत असतील व त्या कार्यक्रमात आपले पंतप्रधान व त्यांचा राजकीय पक्ष घरचे कार्य असल्याप्रमाणे राबत असतील तर मग काँग्रेसच्या राष्ट्रीय यात्रांवर टीका करण्याचे कारण नाही,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
“राहुल गांधी यांनी काय करायचे हा त्यांचा प्रश्न. राहुल गांधी यांच्यावर इतके हल्ले करूनही त्यांचे मनोधैर्य तुटलेले नाही व ते ‘भारत जोडो’ यात्रेचे नेतृत्व करणार आहेत हे भाजपाच्या पचनी पडलेले नाही, ही खरी पोटदुखी आहे. रविवारी तळपत्या उन्हात काँग्रेसने रामलीला मैदानावर महागाईविरोधात मोठी रॅली केली. देशभरातील काँग्रेसवाले जमले. एकंदरीत ‘शो’ चांगला झाला. आजही दिल्लीत अशा प्रकारचे आंदोलन करण्याचे नैतिक बळ काँग्रेस पक्षात आहे. कारण पक्ष शरपंजरी असला तरी देशातील सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष तोच आहे. स्वातंत्र्य लढ्याचा महान वारसा या पक्षाला लाभला आहे,” असंही शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.
“भारतीय जनता पक्षाकडे असा कोणता वारसा असेल तर सांगावे. काँग्रेसने ७० वर्षांत काय केले वगैरे प्रश्न विचारणाऱ्यांनी आपल्या जन्मतारखा एकदा तपासायला हव्यात. आमचे काँग्रेसबरोबर मतभेद आहेत व राहतील. काँग्रेसच्या फाजील सेक्युलरवादावर आमच्या इतके प्रहार कोणीच केले नाहीत, पण कश्मीरातील फुटीरतावादी मेहबुबा मुफ्तींच्या पक्षापेक्षा काँग्रेस बरी असे भाजपाला वाटत नाही काय? भाजपाचे आजचे बाळसे ही नवहिंदुत्वाची सूज आहे. सर्व प्रश्नांवर ‘हिंदू विरुद्ध मुसलमान’ हाच उपाय त्यांच्याकडे आहे व लोक त्यास फशी पडत आहेत. पुन्हा पाकिस्तानचा बागुलबुवा उभा करून मतांचे ध्रुवीकरणदेखील नेहमीचेच आहे. मात्र आपली हजारो हेक्टर जमीन घशात घालणाऱ्या, सतत घुसखोरी आणि सीमेवर कुरबुरी करणाऱ्या चीनच्या विरोधात कधी पाकिस्तानप्रमाणे ललकारी देताना भाजपावाले दिसत नाहीत. चीनने अर्धे लडाख घशात घातले तरी ‘भारत जोडो’ वर चिखलफेक करणारे गप्प आहेत. त्यांचा राष्ट्रवाद, हिंदुत्व येथे थंड का पडते?” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
“भारतीय जनता पक्षाकडे कोणताच विचार नाही. विरोधकांची सरकारे पाडायची व पक्ष फोडायचे यापलीकडे त्यांची अक्कल सरकत नाही. कश्मीरात गुलाम नबी आझाद व महाराष्ट्रात शिंदे या एकाच नाण्याच्या दोन बाजू. बिहारात नितीश कुमारांनी वेगळी भूमिका घेताच त्यांच्या पक्षाचे मणिपुरातील पाच आमदार भाजपाने फोडले. केंद्रीय तपास यंत्रणा हाताशी नसतील तर आजचा भाजपा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळेल व उद्या सत्ता गेली तर आपल्यापैकी अनेकांना भ्रष्टाचार, राष्ट्रद्रोह, देश विकणे अशा खटल्यांना सामोरे जावे लागेल, हे भय भाजपास सतावत आहे. ‘भारत जोडो’ वर हल्ला करण्याचे ते एक मुख्य कारण दिसते,” असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
“आजची काँग्रेस कमजोर आहे, पण काँग्रेसचे लचके तोडून आजचा भाजपा मजबूत बनला आहे. ‘काँग्रेस तोडो भाजपा जोडो’ असेच धोरण त्यांनी इतर पक्षांबाबतही राबविले. काँग्रेसने त्यांचा दलित, मुसलमान, ओबीसी हा जनाधार गमावला आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसचे उच्चाटन झाले. हिंदू मतांचे ध्रुवीकरण इथे झाले. महाराष्ट्रात भाजपाने हिंदू मतांतच फूट पाडली. आपल्या विरोधात एकाही राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाने उभेच राहू नये हीच भाजपाची स्वातंत्र्याची किंवा लोकशाहीची व्याख्या दिसते. त्यांना देश किंवा हिंदुत्वाशी देणेघेणे नसून हिंदू विरुद्ध मुसलमान हीच त्यांची राष्ट्रीय ऐक्याची भावना आहे. भारत हा एक विविधतेने नटलेला देश आहे. अनेक धर्म, पंथ, रीतिरिवाज येथे रुजले आहेत व त्यांना एकत्र ठेवून देश एकसंध ठेवावा लागेल. हा विचार नष्ट होणे म्हणजे देशात फुटीची बीजे रोवणे. देशात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, पण हे सर्व मुद्दे राष्ट्रीय पातळीवर उठवणारा एकही आवाज नाही,” अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे.
“ममता बंगालात, नितीश कुमार बिहारात, केसीआर तेलंगणात, विजयन केरळात, तर शिवसेना महाराष्ट्रात आवाज उठवीत आहे. मात्र बाकीचे सर्व मांडलिक बनलेले आहेत. अशा स्थितीत राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा फलदायी ठरेल हे पाहायला हवे. मदत करता येत नसेल तर निदान अपशकुनी मांजरासारखे आडवे तरी जाऊ नये. काँग्रेस पक्ष अंतर्गत भांडणाने जर्जर झाला आहे हे खरेच आहे. तरीही राहुल गांधी एका जिद्दीने भारत जोडण्याच्या मोहिमेवर निघाले. भाजपाने त्यावर टीका सुरू करून राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या यशाचा नारळच वाढवला. आडवाणी यांनीही रथयात्रा काढली व त्याची फळे आजचा भाजपा चाखत आहे. राजीव गांधी, चंद्रशेखर यांनी यात्रा काढल्या. आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. आर. रेड्डी आणि त्यांचे चिरंजीव व सध्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही पदयात्रा काढली. अखिलेश यादवांनीही एकेकाळी उत्तर प्रदेशात सायकल यात्रा काढून जनमत जिंकले होते. आता महाराष्ट्रात आदित्य ठाकरेंच्या ‘निष्ठा यात्रे’ ला उदंड प्रतिसाद लाभला. उद्धव ठाकरेही महाप्रबोधन यात्रेस निघणार आहेत. सध्या यात्रांचे दिवस सुरू झाले आहेत. मात्र राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने भाजपास कामास लावले आहे, त्यांना ‘भारत जोडो’ चे भय वाटत आहे, हेच वास्तव आहे. राजकीय मतभेद दूर ठेवून ‘भारत जोडो’ कडे पाहायला हवे,” असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.

Leave a Reply