भारत जोडलेला एकसंध देश, राहुल गांधींनी ही यात्रा पाकिस्तानातून सुरु करावी – हिमांता बिसवा सरमा

नवी दिल्ली : ७ सप्टेंबर – काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला आजपासून तामिळनाडूच्या कन्याकुमारीतून सुरुवात होणार आहे. १९४७ साली झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीचा संदर्भ देत आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिसवा सरमा यांनी खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “भारत जोडलेला आणि एकसंध देश आहे. त्यामुळे गांधींनी ही यात्रा पाकिस्तानात सुरू करावी”, असे सरमा म्हणाले आहेत.
“१९४७ साली काँग्रेसने भारताचे विभाजन केले. राहुल गांधींना जर भारत जोडो यात्रा सुरु करायची असेल तर त्यांनी ती पाकिस्तानातून करावी. भारतात ही यात्रा सुरू करण्याचा फायदा काय?”, असा सवाल सरमा यांनी केला आहे. काँग्रेसने या यात्रेच्या प्रचारासाठी हिंदी भाषेत एक गाणे प्रसिद्ध केले आहे. देशातील इतर भाषांमध्येही हे गाणे लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे.
भारत जोडो’ यात्रेच्या अधिकृत संकेतस्थळावर या अभियानाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी दिली आहे. “ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ नाही. नागरिकांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा उपक्रम आहे”, असे रमेश यांनी म्हटले आहे. “काँग्रेसला सकारात्मक राजकारण करायचे आहे. आम्हाला जनतेच्या समस्या समजून घेत त्या सोडवायच्या आहेत”, असे मत या यात्रेवर एका व्हिडीओद्वारे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले आहे.
देशातील महागाई आणि बेरोजगारी विरोधात आजपासून कन्याकुमारीतून सुरू होणाऱ्या या यात्रेची सांगता जम्मू काश्मिरात होणार आहे. १५० दिवस चालणाऱ्या या यात्रेत देशभरातील १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून तब्बल ३ हजार ५७० किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.

Leave a Reply