प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या प्राध्यापकाला अटक

नागपूर : ७ सप्टेंबर – प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलांची आर्थिक फसवणूक करणारा एक प्राध्यापक चंद्रपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या प्राध्यापकाने चंद्रपूरसह यवतमाळ, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील 4 महिलांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं असून फसवणूक झालेल्या महिलांची संख्या मोठी असल्याचा पोलिसांना संशय आहे. सोहम वासनिक उर्फ सुमित बोरकर असं या प्राध्यापकाचं नाव आहे.
सोहम वासनिक उर्फ सुमित बोरकर. वय वर्ष 35. भंडारा जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये मराठीचा प्राध्यापक. मात्र या प्राध्यापकाचे कारनामे पाहून एक प्राध्यापक असं काही करू शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही. फेसबुक, मॅट्रिमोनियल साईट्स आणि टिंडर सारख्या समाज माध्यमांचा वापर करून हा प्राध्यापक अविवाहित आणि विधवा महिलांशी ओळख वाढवायचा. स्वतःला अकोला येथील मेडिकल कॉलेजमध्ये स्त्रीरोगतज्ञ असल्याचे सांगत आणि पत्नीचा मृत्यू झाल्याचं सांगत त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक करायचा.
सोहम वासनिक हा प्राध्यापक पदावर चांगल्या पगाराची नोकरी असताना देखील महिलांची आर्थिक फसवणूक का करायचा हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढलेल्या एकाही महिलेचे शारीरिक शोषण केलेले नाही. त्यात ही महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी त्याने एक खास ट्रिक वापरली होती.
समाजमाध्यमावरील ओळखीतून या भामट्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथील एका 65 वर्षीय महिलेचे 24 तोळे दागिने घेऊन पोबारा केला होता. याच प्रकरणाचा तपास करताना हा भामटा प्राध्यापक पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या प्राध्यापकाने चंद्रपूरसह यवतमाळ, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील 4 महिलांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं असून फसवणूक झालेल्या महिलांची संख्या मोठी असल्याचा पोलिसांना संशय आहे.
सध्या आरोपीकडून 29 तोळे सोन्याचे दागिने आणि दोन भ्रमणध्वनी असा एकून 12 लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र या प्रकरणामुळे सोशल साईट्सचा वापर महिलांच्या शोषणासाठी कशा प्रकारे केला जात आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.

Leave a Reply