नागपूर महापालिकेच्या निवडणूकीत भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट 120 जागा जिंकणार – कृपाल तुमाने

नागपूर : ७ सप्टेंबर – आगामी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा शिंदे गट एकत्र लढणार आहे. तसेच दोन्ही एकत्र 120 जागा जिंकू असा दावा शिंदे गटातील रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. नागपुरातील प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिंदे गटाचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांची उपस्थिती होती.
पुढे तुमाने म्हणाले, राज्यातील आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ह्या सर्व निवडणूका यापुढे भाजप आणि शिंदे सेना म्हणजेच ओरिजनल शिवसेना एकत्र लढणार आहे. या संदर्भात भाजपा पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फॉर्मुला तयार असून योग्य वेळेवर सादर केला जाणार असल्याचेही यावेळी तुमाने यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार यावेळी पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये नागपूर, नागपूर जिल्हा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात शिंदे गटाच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात नागपूर लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून मंगेश काशीकर, महानगर प्रमुख, पश्चिम, मध्य व उत्तर सुरज गोजे, जिल्हा प्रमुख संदीप ईटकेलवार, उपजिल्हा प्रमुख पुरुषोत्तम घोटे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
विदर्भात संघटन मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवरात्रात विदर्भात मेळावे घेणार आहे. यामध्ये पूर्व विदर्भाचा मेळावा नागपुरात होईल. तर पश्चिम विदर्भाचा मेळावा अमरावती येथे होणार आहे. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम अनंतचतुर्दशीपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे सुरु होणार असल्याची माहिती यावेळी तुमाने यांनी दिली.
येत्या नवरात्रीत राज्यभरातून अनेक कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते आमच्या शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करतील. तसेच अनेक नेत्यांचे येणेही फायनल झाल्याचा गौप्यस्फोटही यावेळी तुमाने यांनी केला. तसेच विदर्भात शिवसेनेच्या (शिंदे गट) बळकटीकरणासाठी कार्यकर्ते परीश्रम घेत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

Leave a Reply