केवळ १ हजार रुपयांसाठी वेदनेने विव्हळत असलेल्या गर्भवती महिलेला रुग्णवाहिका चालकाने रस्त्यात उतरविले

हमीरपूरः ७ सप्टेंबर – उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक प्रकार घडला आहे. केवळ १००० रुपयांसाठी वेदनेने विव्हळत असलेल्या गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेच्या चालकाने रस्त्यात उतरवण्यात आल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणी रुग्णवाहिकेच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळं प्रशासन हादरले आहे.
हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपुरमधील भौंरा गावचे रहिवासी असलेली उत्तम निषाद यांची पत्नी रेखाला (२४) प्रसववेदना सुरू झाल्या. त्यानंतर कुटुंबियांनी १०२ या क्रमांकावर कॉल करत रुग्णवाहिकेला बोलवून घेतलं. रुग्णवाहिका आल्यानंतर रेखाला सरकार रुग्णालयात नेण्यात येत होतं. मात्र, अर्ध्या रस्त्यात येताच पंधरी गावाकडे रुग्णवाहिका थांबवून महिलेच्या कुटुंबीयांकडे हजार रुपयांची मागणी केली. कुटुंबीयांनी पैसे देण्यास नकार देताच त्यांना गर्भवती महिला आणि कुटुंबीयांना जंगलाच्या रस्त्यात मध्येच उतरवण्यात आले. गर्भवती महिलेसोबत असलेल्या आशा सेविकांनाही न जुमानता त्याना रुग्णवाहिकेतून उतरवण्यात आले.
महिला प्रसव वेदनानी विव्हळत असतानाही जंगलातील रस्त्यावर उतरुन रुग्णवाहिका निघून गेली. त्यानंतर कुटुंबियांनी रुग्णावाहिका चालकांचा व कर्मचाऱ्याच्या या मनमानी कारभाराचा निषेध करत रस्त्यात आंदोलनाचा पवित्रा घेतला. या प्रकरणी प्रशासनाला खबर लागताच त्यांनी परत रुग्णवाहिका घटनास्थळी धाडली. त्यानंतर बऱ्याच वेळानंतर रुग्णवाहिका महिलेला मौहर गावातील सरकारी रुग्णालयात घेऊन आली. त्यांनतर रेखाने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रस्त्याच्या कडेला एक गर्भवती महिला बसेलली दिसत आहे. तिला प्रसव वेदना सुरू झाल्या आहेत. तर पुढे एक रुग्णवाहिका तिथून जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, रुग्णवाहिकेचा चालक व ईएमटी यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.

Leave a Reply