संपादकीय संवाद – भाजपवर आरोप करण्यापूर्वी शिवसेनेने कठोर आत्मपरीक्षण करावे.

दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी मुंबईत शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला हे संपादकीय लिहीत असेपर्यंत मुंबई महापालिकेकडून परवानगी मिळालेली नाही, त्याचवेळी आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने देखील आम्हाला दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घ्यायचा सून आम्हाला मैदान मिळावे म्हणून अर्ज दिला आहे. यामुळे प्रचंड राजकीय वादंग निर्माण झाले असून यात कोण जिंकणार? याबाबत अटकळी बांधणे सुरु झाले आहे. याचवेळी मूळ शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाने आज या सर्व घडलेल्या प्रकाराबाबत भारतीय जनता पक्षावर पातळी सोडून टीका केली असून भाजपला मराठी माणसांमध्ये फूट पडायची आहे. असा गंभीर आरोप केला आहे.
२०१९ मध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात पुरते फाटले, तेव्हापासून थोडेही काही विपरीत घडले की शिवसेनेला त्यामागे भाजपचाच हात असल्याची शंका येते. मुळात मूळ शिवसेनेतला शिंदे गट फुटला तो सरकारमध्ये त्यांची कामे होत नव्हती म्हणून महाआघाडी सरकारमध्ये सर्व सत्तासूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात होती. अजितदादा पवार शिवसेनेतल्या मंत्री आणि आमदारांना दाद देत नव्हते, त्यामुळे नाराज लोकप्रतिनिधी एकत्र आले. या पाठोपाठ शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर जात असल्याच्याही या आमदारांचा राग होता. म्हणून त्यांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला. इथे भारतीय जनता पक्ष काही, साधुसंतांचा पक्ष नाही, तेही राजकारणाचाच बसलेले आहेत, त्यांनी आलेल्या संधीचा फायदा घेतला याचा अर्थ भाजपने हे घडवून आणले असा काढणे चुकीचे होईल.
इंदिरा गांधी देशाच्या पंत्रधान होत्या तेव्हा त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बराच राग होता, त्यामुळे काहीही घडले की त्यांना संघाचा त्यात हार दिसायचा आज शिवसेनेलाही तसेच झाले आहे उद्या कुणी विचारले की आदित्य ठाकरे यांचे अजून लग्न का होत नाही? तर त्यातही भाजपचेच कटकारस्थान आहे असे आरोप सध्या आर्थर रोड तुरुंगात मुक्कामी असलेले संजय राऊत करायला मागेपुढे पाहणार नाही.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता शिवसेनेने ही निरर्थक आगपाखड करणे थांबवायला हवे, दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आपण कुठे चुकतो आहे, याचे आत्मपरीक्षण करायला हवे, मगच कुणावर टीका करावी, उगाचच आपल्या चुका झाकण्यासाठी दुसऱ्यांवर टीका करणे योग्य नव्हे, तुम्ही कितीही ओरड केली तरी जनता शहाणी आहे, ती खरा कोण? हे समजून घेते, याचे भान ठेवायला हवे.

अविनाश पाठक

Leave a Reply